व्यवस्थापकाची आत्महत्या : कोरेगावातील दोन डाॅक्टरांसह तिघांवर गुन्हा

सातारा । कोरेगाव येथील हॉस्पिटलमधील व्यवस्थापकावर 14 लाख रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप करत त्याला मारहाण, जातिवाचक शिवीगाळ आणि मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांसह त्यांच्या एका सहकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्या केलेल्या व्यवस्थापकाचे नाव शशिकांत चंद्रकांत बोतालजी (वय- 32, रा. चिंतामणीनगर, कोरेगाव) असे आहे. याबाबत चंद्रकांत किसन बोतालजी (वय- 69, चिंतामणीनगर, जळगाव रोड, कोरेगाव) यांनी येथील पोलिसात फिर्याद दिली आहे. तर डॉ. सुहास बाळकृष्ण चव्हाण (वय- 40, रा. लक्ष्मीनगर, कोरेगाव), डॉ. गणेश हरिभाऊ होळ (वय- 50, रा. सुलतानवाडी रोड, कोरेगाव) व गोपाळ शिवाजी साळुंखे (वय- 55, रा. पंचायत समितीच्या बाजूला, एकंबे रोड, कोरेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हा दाखल झालेले डाॅक्टर व त्याचा सहकारी असे तिघांनी आपसांत संगनमत करून त्यांच्या कोरेगाव हॉस्पिटलचा टॅक्स वाचविणेसाठी हॉस्पिटलचे बेहिशोबी आर्थिक व्यवहार फिर्यादीचा मुलगा शशिकांत याच्या बँक खात्यावरून करून त्याच्यावर 14 लाख रुपयांची अफरातफर केल्याचा आळ घेतला. त्याच्यावर पोलिस केस करण्याची धमकी दिली. शशिकांतला मारहाण करून, तसेच जातिवाचक शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. माझ्या मालकीची शेतजमीन जबरदस्तीने नावावर करून घेऊन शशिकांतला वारंवार तुला पैसे द्यायचे जमत नसतील तर तुझा जगून काय उपयोग, पैसे तरी द्या नाही तर मरून जा, असे म्हणून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने माझी त्यांच्याविरुद्ध तक्रार आहे. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे करत आहेत.
दरम्यान, शशिकांत बोतालजी यांनी गुरूवारी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजताच त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू असताना रात्री त्यांच निधन झाले. शुक्रवारी दिवसभर याप्रकरणी संबंधित डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी मृत बोतालजी यांचे नातेवाईक, समाजबांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथील पोलिस ठाण्यासमोर गर्दी करून होते. अखेर रात्री बोतालजी यांचा मृतदेह एका रुग्णवाहिकेतून पोलिस स्टेशनसमोर आणण्यात आला. तेव्हा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल झाल्याचे सांगताच मृतदेह असलेली रुग्णवाहिका अंत्यसंस्कारासाठी चिंतामणीनगरकडे नेण्यात आली.