सातारा, फलटण, पाटण नंतर कराड तालुक्यातील 3 गावांचा निर्णय : आनंदाचा शिधा नको, आनंदाने आरक्षण द्या

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा जिल्ह्यातील वडूथ, आरफळ, फलटणमधील आसू या गावानंतर आता कराड तालुक्यातील तीन गावांनी राजकीय नेत्यांना बंदी केली असून शेणोली गावाने शासनाचा आनंदाचा शिधा नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. कराड तालुक्यातील शेणोली, खुबी आणि खोडशी या गावात आता मराठा आरक्षणासाठी गावबंदी करण्याच्या मराठा समाजाने निर्णय घेतला आहे. पाटण तालुक्यातील नेरळे येथेही गावबंदी करण्यात आली आहे. यावर आता सरकारमधील मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे.
राज्यात ठिकठिकाणी आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी समाज एकवटू लागला आहे. सरकारला मराठा आरक्षणासाठी 40 दिवसाचा वेळ देण्यात आला होता. उद्या दसऱ्यादिवशी सरकारने मागितलेली वेळ संपणार असून दि. 25 पासून मनोज जरांगे- पाटील अन्न आणि पाणी त्याग आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी पुढील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातही अनेक गावे आरक्षणासाठी वेगवेगळे निर्णय घेताना दिसत आहेत. कराड तालुक्यातील शेणोली या गावाने आनंदाचा शिधा नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा मराठा समाजाला शब्द अन् आवाहन
सातारा जिल्ह्यात मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमदार खासदार यांना गाव बंदीचे फलक झळकु लागले आहेत. वडूथ गावानंतर आरफळ, आसू,खुबी, खोडशी, निमसोड या गावामध्ये पुढाऱ्यांना येण्यास बंदी अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. या निर्णया विषयी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले असून कायमस्वरूपी मराठा आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे आणि मी ही पालकमंत्री म्हणून शब्द देतो. मात्र असे गाव बंदीचे निर्णय नागरिकांनी घेऊ नयेत असे मत मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केलंय