मराठा आरक्षणाचं लोणं मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पसरलं : सातारा, पाटणला साखळी उपोषण तर पोतलेत रक्ताचे अंगाठे पत्रावर

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावरुन सरकारला दिलेल्या 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर आज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर अंतरवाली सराटी येथे प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केलेली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु झालेल्या उपोषणाला राज्यभरातुन मोठा पाठिंबा मराठा समाजा मधुन मिळतोय. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यात देखील मराठा समाजाच्या वतीनं लोकं त्यांना पाठींबा जाहिर केला आहे. सातारा व पाटण शहरात आजपासून साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. तर कराड तालुक्यातील पोतले येथे मराठा सकल समाजाने स्वतः च्या रक्ताने अंगठे उठवत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालया समोर सातारा मराठा समाजानं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमरण साखळी उपोषणाला नारळ फोडून सुरुवात केली आहे. मात्र, आम्हाला पाठिंबा देण्यासाठी येणारे लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळींनी राजीनामा देऊन यावे. अन्यथा कोणत्याही प्रकारचा पाठिंबा घेणार नाही. तसेच जोपर्यंत आमच्या मराठा समाजाला न्याय मिळत नाही. तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आम्ही देखील उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. आता साता-यातुन सुद्धा साखळी आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. पाटण शहरातही नविन पंचायत समितीसमोर साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली.
पोतलेत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदीचा बॅंनर लागला
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली जात आहे, अशातच आता कराड तालुक्यातील पोतले गावाने आरक्षणासाठी २०० हून अधिक महिलांसह पुरूषांनी स्वतः च्या रक्ताचे अंगठे पत्रावर उठवत आरक्षण मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यंत्र्यांना दिले जाणार आहे. पोतले गावातून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गावातून प्रभातफेरी काढत प्रवेश बंदीचे बॅंनर्स सुद्धा झळकवले आहेत. स्वतःच्या रक्ताने अंगठे उठवण्याच्या मोहिमेत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसुन येत आहे.