हुतात्मा जवान शंकर उकलीकर यांचे पार्थिव थोड्या वेळात येणार : आज अंत्यसंस्कार
कराड | कारगिलमधील लेह येथील बर्फाळ प्रदेशातील एका दुर्घटनेत भारतीय सैन्यदलातील इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड) येथील जवान शंकर बसाप्पा उकलीकर (वय- 38) हुतात्मा झाले आहेत. त्यांचे पार्थिव आज सकाळी आठ वाजता येथील विजय दिवस चौकात आणण्यात येईल. तेथून ते पार्थिव गावी वसंतगडला नेऊन अंत्ययात्रा काढण्यात येईल. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शंकर उकलीकर यांच्या मृत्यूची बातमी समजताच वसंतगडसह परिसरावर शोककळा पसरली. वसंतगड ग्रामपंचायतीने वसंतगडाच्या पायथ्याशी अंत्यसंस्कारांची तयारी केली आहे. तसेच दोन दिवस पूर्ण वसंतगड बंद ठेवण्यात आले असून आज परिसरातील तांबवे फाटा, वसंतगड, आबईचीवाडी येथील बाजारपेठ बंद ठेवली जाणार आहे. हुतात्मा जवान उकलीकर यांचे पार्थिव पुणे विमानतळावर कालच दाखल झाले असून त्यांना मानवंदना देण्यात आली आहे.
आज सकाळी थोड्या वेळात कराड येथील विजय दिवस चौकात पार्थिव दाखल होणार आहे. तेथून सैन्य दलाच्या वाहनातून दत्त चाैक, कोल्हापूर नाका, वारूंजी फाटा, विजयनगर, सुपनेमार्गे थेट घरी पोहचणार आहे. त्यानंतर घरातून गावकऱ्यांनी फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे. कराड- पाटण मार्गावरून वसंतगड गावात ही मिरवणूक जाणार आहे. तेथून त्यांच्यावर वसंतगडाच्या पायथ्याशी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.