Satara : मंत्री शंभूराज देसाई कोरोना पॉझिटिव्ह

पाटण | राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत स्वतः शंभूराजे देसाई यांनी फेसबुक पोस्ट लिहित माहिती दिली आहे. छगन भुजबळ यांच्यानंतर आता शंभूराजे देसाई कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
आज मरळी (ता. पाटण) येथील त्यांच्या मूळ गावी निनाई देवी यात्रेत ते सहभागी झाले होते. दिवसभर त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली, मात्र त्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांनी सर्व बैठका मास्क लावूनच घेतलेल्या दिसून आल्या. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असा आल्याचे माहिती त्यांनी दिली आहे.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले आहे.



