कराडची घोषणा, खटक्यावर बोट अन् जाग्यावर पलटी : आ. बाळासाहेब पाटलांचा थेट इशारा
– विशाल वामनराव पाटील
आम्ही कराड तालुक्यातील मंडळी आमची राजकारणाची पध्दत जरा वेगळी आहे. आमच्या कराड दक्षिणला एक भाग आहे. त्याठिकाणी एक घोषणा आहे, खटक्यावर बोट अन् जाग्यावर पलटी हे काम आपल्याला यापुढील काळात करायचं आहे, असं म्हणत जिल्ह्यातील विरोधकांना माजी सहकार मंत्री व आमदार बाळासाहेब पाटील यांनी इशारा दिला.
अंबवडे (ता. कोरेगाव) येथे आ. शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. श्रीनिवास पाटील, माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, प्रभाकर देशमुख, सविनय कांबळे, दिपक पवार, सत्यजित पाटणकर, सारंग पाटील यांच्यासह सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, आपले दैवत छ. शिवाजी महाराज कधीही दिल्लीच्या तख्यातासमोर झुकले नाही. आता तीच वेळ आली आहे. केंद्रातील सरकार ज्या प्रमाणे सांगत आहे, त्याप्रमाणे राज्यातील सरकार काम पहात आहे. लोकांच्यावर बंधन घालायची. केंद्राचा अजेंडा राबवायचं काम ही मंडळी करत आहेत. या सर्व प्रकारची चीड सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. आज नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका होत नाहीत. आज जातीवर आधारित राजकारण सुरू आहे. आता लोकसभेची निवडणुक होईल, त्यानंतर विधानसभा होईल. राज्य सरकारने जे काम केले आहे, त्याचा रोष आपल्यावर होवू नये. यामुळे आता लोकसभा निवडणुका होतील. विधानसभा निवडणुका नंतर होतील.