रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीत आ. पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का : भोसले गटाच्या 7 जागा बिनविरोध

कराड | कराड तालुक्यातील महत्वपूर्ण असलेल्या रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या दिवशी सत्ताधारी डॉ. अतुल भोसले गटाच्या समर्थकांनी विरोधी आ. पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का दिला आहे. सत्ताधारी भोसले समर्थक गटाच्या कृष्णा विकास आघाडीच्या 7 जागा बिनविरोध निवडून आल्या असून, गेल्या 35 वर्षांत इतक्या जागा एकाचवेळी बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे भोसले गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
कराड तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली असून आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. रेठरे बुद्रुक येथे सरपंचपदासह 18 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण 92 जणांनी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच सत्ताधारी व विरोधी गटाकडून निवडणुकीसाठी तयारी सुरू होती. मात्र आज अर्ज माघारीच्या दिवशी सत्ताधारी भोसले गटाने 7 जागा बिनविरोध निवडून आणत, विरोधकांना जबर धक्का दिला.
सत्ताधारी कृष्णा विकास आघाडीचे विठ्ठल वॉर्डमधून शरद नामदेव धर्मे, मारुती वॉर्डमधून रुक्साना गुलाब मुल्ला, शिवनगर वॉर्डमधून संग्राम दिलीप पवार, संगीता शिवाजी सावंत, सचिन अरुण जाधव, लक्ष्मी वॉर्डमधून शर्मिला संतोष मोहिते, भाग्यश्री रोहित पवार अशा एकूण 7 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवनगर वॉर्डमधील सर्वच जागांवर सत्ताधारी भोसले गटाचे समर्थक निवडून आले आहेत.



