जागेच्या वादातून खुनीहल्ला : कराड पंचायत समितीच्या माजी सदस्यासह 10 जणांवर गुन्हा
कराड | जमिनीच्या वादातून झालेल्या मारामारीप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार दोन्ही गटातील दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी पंचायत समिती सदस्याचा समावेश आहे. प्रवीण अरुण चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, अलेज मुतवल्ली, मतीन मुतवल्ली, शकील मुतवल्ली यांच्यासह आणखी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोटे येथे अलेज मुतवल्ली याच्या जागेत मतीन मुतवल्ली याचा भाऊ जेसीबीने काम करीत असताना मुकुंद पाटील हे विचारणा करण्यासाठी त्याठिकाणी गेले. त्यावेळी शकील मुतवल्ली याने प्रविण चव्हाण यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने मुकूंद पाटील यांच्यावर सत्तुराने वार केले. नयन पाटील यांच्या डोक्यात आलेज मुतवल्ली याने चाकूने वार केले. तसेच सर्वांनी शिवीगाळ, दमदाटी करीत ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याउलट मतीन शकील मुतवल्ली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, मुकुंद पाटील, नयन पाटील, सत्यजित पाटील या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोटे गावच्या हद्दीत जेसीबीने झाडेझुडपे काढण्याचे काम सुरू असताना नामदेव पाटील याने जेसीबी चालकाला शिवीगाळ केली. तसेच मुकुंद पाटील याने त्याच्या हातातील कोयता सत्यजित पाटील यांच्याकडे दिल्यानंतर सत्यजीत पाटील याने कोयत्याने मतीन मुतवली यांच्यावर वार केला. नयन पाटील याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.