बेपत्ता इस्टेट एजंटाचा खूनच : खंडाळ्यात मृतदेह पुरला, चाैघांना अटक
सातारा प्रतिनिधी। वैभव बोडके
साताऱ्यातील रिअल इस्टेट एजंटचा खून करून त्याचा मृतदेह पूरल्याचा प्रकार दोन महिन्यांनी उघडकीस आला आहे. साताऱ्यातील संदीप संकपाळ असे खून झालेल्या इस्टेट एजंटाचे नाव असून ऑगस्ट महिन्यापासून तो बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी सातारा पोलिस ठाण्यात दिली होती. या खून प्रकरणात चाैघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, संदीप संकपाळ हे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. संशयित शिवाजी शिंदे याचे संदीप संकपाळ यांच्यात जमीन विक्री कमिशनवरुन वाद झाला होता. यातून चिडून संदीप संकपाळ यांना 21 ऑगस्ट 2023 रोजी साताऱ्यातील पोवई नाक्यावरुन संशयितांनी नेले. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी दोनच्या सुमारास संकपाळ यांचा गळा आवळून खून करण्यात आला. तर पुरावा नष्ट करण्यासाठी संदीप संकपाळ यांचा मृतदेह पाडेगाव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत ओढ्याजवळ वघळीत पुरून पुरावा नष्ट करण्याच प्रयत्न करण्यात आला. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
गुन्ह्यातील संशयितांची नावे पुढीलप्रमाणे :-
सातारा शहर पोलिसांनी या गुन्ह्यात शिवाजी नामदेव शिंदे (रा. सैदापूर, सातारा), अक्षय चव्हाण (रा. कोंडवे, ता. सातारा), विशाल उर्फ भैय्या खवळे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सतारा) आणि सुमीत भोसले (रा. पाडेगाव, ता. खंडाळा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.