फलटण तालुक्यातील बेपत्ता इसमाचा खून : मृतदेह सार्वजनिक पाणीपुरवठा विहीरीत

लोणंद । आठवडाभरा पासून बेपत्ता असलेल्या इसमाचा खून झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून लोणंद पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. सचिन धायगुडे (वय- 35, रा. डोंबाळवाडी, ता. फलटण) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर याबाबची फिर्याद अश्विनी सचिन धायगुडे यांनी दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार (दि. 23) रोजी 6.30 वाजण्याच्या सुमारास सचिन धायगुडे हा गुरांच्या धारा काढण्यासाठी शेतातल्या गोठ्यात गेल्यानंतर रात्री आठ वाजल्यापासून बेपत्ता होता. त्याबाबतची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सायफन पाईप टाकण्याच्या कारणावरून सचिन व संशयित आरोपीचा वाद झाल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार लोणंद पोलिसांनी संशयित आरोपी प्रदिप दत्तात्रय टेंगले व राहूल नामदेव धायगुडे यांना ताब्यात घेतले होते.
या घटनेचा लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी सहकाऱ्यांसह कसून शोध घेतला. लोणंद पोलीसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता. सचिन धायगुडे याचा गळा दाबून खून करून त्याचा मृतदेह बंद असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहीरीत टाकला असल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.



