माण तालुक्यात मायलेकीचा दोरीने गळा आवळून खून
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वृध्द आई सोबत झोपी गेलेल्या लेकीचा अज्ञातांनी दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. माण तालुक्यातील (पर्यंती) येथील दुहेरी हत्याकांडाने परिसर हादरुन गेला आहे. श्रीमती संपदाबाई लक्ष्मण नरळे (वय- 75 ) आणि त्यांची मुलगी नंदाबाई भिकू आटपाडकर (वय- 58 ) अशी या मृतांची नावे आहेत.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, श्रीमती संपदाबाई आणि त्यांची मुलगी नंदाबाई या दोघीजण पर्यंती येथील ग्रामपंचायत कार्यालय नजिकच्या घरात राहत होत्या. घरातच छोटेसे किराणा मालाचे दुकान दोघीजण मिळून चालवत असत. आज सकाळी उशीरापर्यंत दुकान व घराचे दरवाजे बंद राहिल्यामुळे ग्रामस्थांनी घराचा बाहेरील दरवाजा खटखटून त्यांना हाका मारण्याचा प्रयत्न केला असता. घरात आत असलेल्या दोघींचा काहीच प्रतिसाद मिळू शकला नाही. शेवटी ग्रामस्थांनी बंद दरवाजा उघडला.
घराच्या आत जात ग्रामस्थांनी पहाणी केली असता दोघीही मायलेकी निपचित मृत अवस्थेत पडलेल्या निदर्शनास आल्यानंतर म्हसवड पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेहाची प्राथमिक पाहणी केली असता दोघींचाही दोरीच्या साह्याने गळा आवळून अज्ञातांनी खून केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असुन
संशयित गुन्हेगाराचा तपास सुरु केला आहे. मृत मायलेकी बरोबर कोणाचे वादविवाद होते का? याची चौकशी पोलीस करत आहेत. या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.