सहापदरीसाठी मुरूम उपसा : उंब्रजला डीपी जैन कंपनीचे पोलकलेन, डंपर ताब्यात

कराड | सहा पदरीकरणाच्या कामात लागणाऱ्या भरावासाठी कराड तालुक्यातील साबळवाडी बंधाऱ्यात बेसुमार उत्खनन सुरू आहे. या उत्खननासाठी संबंधित कंपनीने कोणतीही परवानगी घेतली नसल्याने उंब्रज ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर बुधवारी महसूल विभागाच्या पथकाने साबळवाडी येथील बंधाऱ्यावर छापा टाकून 2 पोकलेनसह 8 डंपरवर कारवाई केली आहे. उंब्रज पोलीस ठाण्याच्या आवारात ही वाहने लावण्यात आली आहेत. महसूल प्रशासनाने 44 ब्रास मुरुमासह कोट्यवधी रुपये किंमतीची वाहने ताब्यात घेतली आहेत. रात्री उशिरापर्यंत पुढील कारवाई सुरू होती.
दरम्यान महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवार दि. 26 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. उंब्रजचे मंडल अधिकारी युवराज काटे यांच्यासह इंदोली मंडल अधिकारी श्रीकांत धनवडे, तलाठी एस एस काळे यांनी साबळवाडी येथील बंधाऱ्यावर छापा टाकला. त्यावेळी तेथे जैन कंपनीचे चार डंपर व दोन पोकलेन मिळून आले. तसेच अंधारवाडी रोडने मुरूम वाहतूक करणारे चार डंपर मिळून आले. महसूल अधिकाऱ्यांनी एकू आठ डंपर व दोन पोकलेन ताब्यात घेऊन 44 ब्रास मुरूमासह या वाहनांवर कारवाई केली आहे. कोणतीही परवानगी न घेता मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सायंकाळच्या सुमारास साबळवाडी येथे छापा टाकला. यावेळी बंधाऱ्यात डीपी जैन कंपनीचे चार डंपर व दोन पोकलेन मिळून आले. तसेच अंधारवाडी रोडने मुरूम वाहतूक करणारे चार डंपर मिळून आले. महसूल पथकाने आठ डंपर व एक पोकलेन उंब्रज पोलीस ठाण्यात आणून लावले तसेच घटनास्थळी आणखी एक पोकलेन आहे. दरम्यान या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली. पोकलेन व डंपर पोलीस ठाण्याकडे नेताना सुमारे १५ ते २० मिनिटे सेवा रस्तावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे या कारवाईच्या चर्चेला नागरिकांच्यात उधाण आले.
सद्यस्थितीत उंब्रज-कराड परिसरात महामार्ग सहा पदरीकरणाचे काम जोमात सुरू आहे. मात्र या कामावेळी नियमांची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा केला जात आहे. भरावासाठी स्थानिक गावातून काही ठिकाणी उपसा सुरू आहे. या अनुषंगाने महसूल पथकाने आज साबळवाडी येथे बंधाऱ्यात कारवाई करून आठ डंपर ताब्यात घेतले. सदरची वाहने सायंकाळी उशिरा उंब्रज पोलीस ठाण्याच्या लावण्यात आली असून कारवाईचे काम सुरू होते. अशी माहिती मंडळ अधिकारी युवराज काटे यांनी दिली.
सतर्क ग्रामपंचायतीमुळे कारवाई
साबळवाडी येथे बंधाऱ्यातून कोणतीही परवानगी न घेता डीपी जैन कंपनीकडून शेकडो ब्रास माती मिश्रीत मुरुमाचे उत्खनन करण्यात करण्यात आले. बुधवारी उंब्रज येथून डंपरने ही वाहतूक सुरू होती त्यामुळे उंब्रजकरांना त्रास सहन करावा लागला. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेवून महसूल प्रशासनाला कारवाईला भाग पाडले.