पाटणला (दादा) भाकरी फिरवावी लागेल

विशाल वामनराव पाटील । विशेष
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे भाजप- शिवसेना शिंदे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जावू शकतो. तेव्हा आता पुन्हा या जिल्ह्यात घड्याळाचा गजर व्हावा, यासाठी काही ठिकाणी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे भाकरी फिरवावी लागेल. प्रामुख्याने पाटणला माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव फारसे प्रभाव पाडू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती सध्यातरी पहायला मिळत आहे. सातारा जिल्हा बॅंक वगळता विधानसभा, ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी अन् नुकतीच झालेली बाजार समिती निवडणुकीत तब्बल 40 वर्षांनी पराभव. यामुळे आता पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाईंचा विजयाचा वारू रोखण्यासाठी सत्यजित पाटणकर यांना आक्रमक व्हावे लागेल. अन्यथा दादा, साहेबांनी म्हटल्याप्रमाणे भाकरी फिरवावी लागेल.
सातारा जिल्ह्यातील पाटणला पक्षविरहीत दोन पारंपारिक गटात लढत पहायला मिळत आलेली आहे. सध्या देसाई गट अधिक प्रभावी झाला आहे, हे नाकारून चालणार नाही. परंतु दुसरी बाजू म्हणजे पाटणकर गटाचे कार्यकर्ते आजही केवळ गटा- तटाच्या राजकारणामुळे शंभूराज देसाई यांच्याकडे जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मैदान सोडून पळून जाण्याएवढी परिस्थिती सध्यातरी राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाची झालेली नाही. अशावेळी कार्यकर्ता जो काही सत्ता, आक्रमकता या गोष्टी नसल्याने पाटणकर गटाला, राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आमच्याकडे सत्ता नाही, विरोधक यंत्रणेचा वापर करीत आहे. सत्तेची मस्ती, निवडणुकीत दाखवू या केवळ बाष्फळ गप्पा करण्यापेक्षा अलर्ट मोडवर येणं गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे ज्या- ज्यावेळी आंदोलन होत असतात, तेव्हा नेहमीचेच पाटण शहरातील 50- 100 कार्यकर्ते सोडले तर ताकद दाखविण्यात आज राष्ट्रवादीचा गट कमी पडत आहे. दुसरीकडे मरळी कारखान्यावर केवळ शंभूराज देसाई उपस्थित राहणार म्हटले तर 400 – 500 कार्यकर्ते जमविले जातात. तेव्हा गर्दीचा इफेक्ट हा जाणवत आहे, त्यामुळे कार्यकर्त्याला साहजिक वाटते, आपल्या नेत्याकडे काय आहे अन् काही नाही.
बाजार समितीवेळी आमचा विजय पक्का ही खूणगाठ बांधून गाफीलपणा चांगलाच भोवला हे सत्य आहे. तर दुसरीकडे शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई आणि बंधू रविराज देसाई यांनी सत्तेचा पूरेपूर वापर करत अनपेक्षित वाटणारा विजय खेचून आणला. त्यामुळेच सकाळी साताऱ्यात असणारे शंभूराज देसाई दुपारी विजयी रॅलीत सहभागी झाले. या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावर जाहीरपणे पदाधिकाऱ्यांची चांगलीच धुलाई केली, अतिशहाणपणा, अति आत्मविश्वास यावर चांगलेच खडे बोल सुनावले. परंतु आता यातून काही बोध घेणार की वाड्यातून पुन्हा निवडणुक निकालानंतर केवळ एक- दोन दिवस चर्चा होणार.
पाटणकर गटाकडे आजही स्वतंत्र व विजय खेचून आणणारा मतदार (गट) आहे. त्यासाठी तळागाळापर्यंत नेत्याने लक्ष देणे गरजेचे आहे. स्वतंत्र विश्वासू सहकाऱ्यांची फळी निर्माण करणं गरजेचे आहे. परंतु सध्या पाटणकरांच्याकडे सत्यजित पाटणकर यांच्यानंतर विश्वासाने कार्यकर्त्याचे प्रश्न जाणून घेणारा विश्वासू कार्यकर्ता, पदाधिकारी नाही. त्यातच पाटण विधानसभा मतदार संघ पाटण, तारळे, चाफळ, मल्हारपेठ, मोरगिरी. कोयना, ढेबेवाडी, कुंभारगाव, काळगांव आणि सुपने- तांबवे असा 10 ठिकाणी विभागला गेला आहे. तेव्हा यांचाही आता अभ्यास करून स्वतंत्रपणे पदाधिकारी नेमून त्याच्यांवर विश्वासाने जबाबदारी देणे गरजेचे आहे.
सोशल मिडियावर, माध्यमात आता दररोजच शंभूराज देसाई दिसत असतात. अशावेळी सत्यजित पाटणकर यांच्यावर मुद्दा मिळाल्यास तोफ डागत असतात. परंतु सत्यजित पाटणकर यावर काहीच बोलत नाहीत, विरोधक म्हणून आपल्या भूमिका लोकांच्यापर्यंत पोहचविण्याचे माध्यम असलेल्या माध्यमात, सोशल मिडियावर दिसत नाहीत, असा आरोपच त्याच्यावर माध्यमांचाही आणि कार्यकर्त्यांचाही आहे. तेव्हा आता सत्यजित पाटणकर (दादा) आपणांस आक्रमक व्हावेच लागणार आहे, अन्यथा पाटणला विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा आमदार पाहिजे असल्यास दादा पाटणला भाकरी फिरवावी लागणार हे मात्र, नक्की. तेव्हा आता मिळमिळीत भूमिका सोडून दोन हात करण्यासाठी वाड्याबाहेर पडा तेही तयारीनिशी.
(पुढील भाग ः- लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दाैऱ्यावेळी लोकसभा अन् बोटचेपी भूमिका)