राष्ट्रवादीचे आ. रोहीत पवार म्हणतात… आज मी सत्तेच्या बाजूला असतो
शिवसेनेचे संजय शिरसाट यांना लगावला टोला
कराड | पवार कुटुंबातील व्यक्तीला संधी मिळाल्यानंतर अध्यक्ष व्हायचं असतं तर मी जिल्हा परिषदेत झालो असतो. महाविकास आघाडी सरकारमध्ये मी मंत्री होऊ शकलो असतो. पण मी झालो का? मला मंत्री कुठे व्हायचं असत, पदासाठी मी लढत असतो तर मी आज सत्तेच्या बाजूला असतो. आम्ही पदांसाठी कोठेही भेदभाव करत नाही. परंतु मला पद नको विचार महत्त्वाचा आहे. संजय शिरसाट स्वतः प्रवक्ते असल्यामुळे त्यांच्या पोटात कुठेतरी दुखतंय. त्यांना मंत्री व्हायचं आहे ते स्वतः बोललेले आहेत. आम्ही कुठेही लाचार झालेले नाही, आम्ही नियत कुठे विकलेली नाही. तेव्हा तुम्ही कुठलेही राजकीय पतंग उडवू नका, असा टोला आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे संजय शिरसाट यांना लगावला.
आमदार रोहीत पवार हे दोन दिवस कोल्हापूर दाैऱ्यावर निघालेले असताना त्यांनी कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक साैरभ पाटील, समीर कुडची, संजय पिसाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भरतीमध्ये काळाबाजार सुरू त्याविरोधात रस्त्यावर उतरू
सध्या सुरू असलेल्या भरतीमध्ये काळाबाजार सुरू आहे, सरकार मुद्दामून खाजगी कंपन्यांकडून भरती करत आहे. पेपर अनेक वेळा फुटलेले आहेत. त्यामध्ये एफआयआर होऊन सुद्धा सरकार उलट म्हणत पेपर कुठे फुटला आहे. त्यामुळे कुठेतरी चुकीचं घडतंय आणि त्याची पाठराखण सरकार करतंय. पुढच्या काही दिवसात यामध्ये सुधारणा न झाल्यास शिक्षक भरती, प्राध्यापक भरतीत जो काही काळाबाजार चालला आहे. या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार रोहीत पवार यांनी दिला आहे.