मुलीची छेड काढणाऱ्यास सश्रम कारावास : कराड कोर्टाचा निकाल

कराड । सार्वजनिक नळावर पिण्यासाठी पाणी आणायला गेलेल्या मुलीची छेड काढून तीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी सोमवारी ही शिक्षा ठोठावली.
सतीश नामदेव मदने असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सरकार पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी 31 मार्च 2017 रोजी गावातील सार्वजनिक नळावर पाण्याची कळशी घेऊन पाणी आणण्यासाठी गेली होती. पाणी घेऊन ती परत घराकडे येत असताना आरोपी सतीश मदने याने तीचा हात धरुन तीला जवळ ओढले. तसेच तीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याबाबत पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सरकार पक्षाच्यावतीने अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी सादर करण्यात आलेले पुरावे तसेच पिडीत मुलगी, तपासी अधिकारी, साक्षीदार यांच्या साक्ष महत्वपुर्ण ठरल्या. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला गुन्ह्यात दोषी धरले. तसेच एक वर्ष सश्रम कारवास आणि 3 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी 15 दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला अॅड. ऐश्वर्या कदम, अॅड. कोमल लाड यांनी सहकार्य केले.