नव्या शैक्षणिक धोरणाविषयी साताऱ्यात शनिवारी कार्यशाळा : अशोकराव थोरात

कराड | नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील आव्हानांसंदर्भातील जनजागृतीसाठी येत्या शनिवारी (दि. 5) साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात कार्यशाळेचे आयोजिल्याची माहिती सातारा जिल्हा शिक्षण संस्था संचालक संघाचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी दिली. कराड येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अशोकराव थोरात म्हणाले, सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग, सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ, शिक्षण संस्था संचालक संघ, माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बॅ. पी. जी. पाटील शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजिलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी सकाळी साडेदहा वाजता आयोजिले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्या उपस्थितीत आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. एल. नायकवडी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यशाळेचे उद्घाटन होईल.
केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरणाला तीन वर्षे लोटली तरी ते महाराष्ट्रात आजवर कुठेही राबवले गेलेले नाही. यासंदर्भात राज्य सरकारने अभ्यासगट स्थापलेला असून, त्यातील तज्ज्ञ नवीन शैक्षणिक धोरण राबवण्याबाबत मसुधा बनवत आहेत. याच पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा आयोजिलेली आहे. त्यात ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020 महाराष्ट्र शासनाची भूमिका’ याबाबत ‘एससीईआरटी’ उपसंचालक व ‘निपा’च्या संचालक नेहा बेलसरे तर ‘शालेयस्तरावर कौशल्य शिक्षण, महत्व व अंमलबजावणी’ या विषयावर ‘लेंड अ हॅन्ड इंडिया’चे सहाय्यक राज गिल्डा हे मार्गदर्शन करणार आहेत. नवे शैक्षणिक धोरण व आर्थिक तरतूद या विषयावर ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले तर नवीन शैक्षणिक धोरण – संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी पालक भूमिका व जबाबदारी या विषयावर शैक्षणिक सल्लागार अनुराधा माने-झांजुर्णे या मार्गदर्शन करतील असे अशोकराव थोरात यांनी या वेळी सांगितले.