Health मधुमेह आणि उच्च रक्तदाबाला एकच गोळी : प्रा. अश्विनी पाटील यांना सरकारचे पेटंट

हॅलो न्यूज | आज मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच अनेक महागडी कायमस्वरूपी औषध घ्यावी लागत असल्याने आर्थिक भारही मोठा पडत असतो. परंतु आता या दोन्ही आजारावर एकच गोळी काम करणार आहे. प्रा. अश्विनी भाऊसाहेब पाटील यांनी मधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांसाठी एकच औषध तयार केले असून, या औषधाला भारत सरकारने पेटंट बहाल केले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी सावर्डे महाविद्यालयात केमिस्ट्री विभागप्रमुख म्हणून प्रा. अश्विनी पाटील कार्यरत आहेत. आजपर्यंत बाजारपेठेत अशाप्रकारचे दोन्ही आजारांसाठी एकच औषध उपलब्ध नाही. औषध निर्माण क्षेत्रात हे संशोधन क्रांती करणारे आहे. बायलेअर फ्लोटिंग टॅबलेट ऑफ लोसरटॅन अँड मेटफॉरमीन युसिंग नॅचरल पॉलिमर्स या संशोधन कार्यास पेटंट कार्यालय, भारत सरकार यांच्याकडून पेटंट बहाल करण्यात आले आहे.
आजपर्यंत मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना वेगवेगळ्या गोळ्या घ्याव्या लागतात. याचा दुष्परिणाम किडणीवर देखील होतो. साईडइफेक्टस् वाढतात. याशिवाय रुग्णांना दोन प्रकारची औषधे घेणे खर्चिक पडते. पण नव्या संशोधनामुळे भविष्यात या दोन्ही आजारांसाठी एकच गोळी मिळणे शक्य होणार आहे. मात्र, ही गोळी बाजारात येण्यास अनेक टप्पे पार करावे लागणार आहेत. परंतु मधुमेही आणि उच्च रक्तदाब असणार्या रुग्णांसाठी हे औषध महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास प्रा. अश्विनी पाटील यांनी व्यक्त केला आहे.



