इंदोलीत तमाशा सुरू असताना जुन्या वादातून एकावर कोयत्याने वार

कराड | इंदोली (ता. कराड) येथील 10 जणांनी लाकडी दांडके व कोयत्याने एकास मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. गावात गावच्या वार्षिक यात्रेत तमाशा सुरू असताना जुन्या वादातून ही घटना घडली. याबाबतची फिर्याद समाधान शंकर नागमले यांने उंब्रज पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक शंकर नागमले (वय- 27) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. नयन बाबूराव निकम, जीवन ज्योतिराम शिंदे, दीपक दत्तात्रय लोकरे, तुषार पंडित निकम, प्रज्वल निकम (सर्व रा. इंदोली), तर प्रेम कदम (रा. उंब्रज) व इतर तीन ते चार जण असे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इंदोली येथे 2 मे रोजी ग्रामसभा होती. त्या वेळी फिर्यादीचा भाऊ अधिक हा उपसरपंच निखिल संकपाळ यांच्या बाजूने बोलत होता. या वेळी वादावादी झाली होती. यानंतर वार्षिक यात्रेनिमित्त तमाशा सुरू असताना फिर्यादीचे भाऊ अधिक नागमले यास प्रज्वल निकम याने काम आहे, असे म्हणत बोलावून नेले. या वेळी एका वडापाव सेंटरसमोर रस्त्यावर प्रज्वल निकम याने हातातील लाकडी दांडक्याने व दगडाने अधिक यास मारहाण केली. यावेळी नयन निकम व जीवन शिंदे यांनी तू ग्रामसभेवेळी जास्त बोलत होतास तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणून कोयत्याने अधिकच्या डोक्यात व हातावर वार केला. यानंतर जीवन शिंदे यांनी कोयता घेऊन अधिक याच्या अंगावर धावून जाऊन दमदाटी केली.
या वेळी फिर्यादी भांडणे सोडवण्यास गेले असता प्रज्वल निकम याने बाजूला नेऊन शिवीगाळ केली. या वेळी मांडणे सोडवण्यासाठी चौकात असणारे निखिल संकपाळ, विनायक नागमले, रोहित संकपाळ, आदित्य गायकवाड आले. त्या वेळी संशयित तेथून पळून गेले होते. जखमीस उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मारहाणप्रकरणी 10 जणांवर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत.