संतापजनक : मुलाची आई-वडिलांना काठीने मारहाण
कराड तालुक्यातील घटना
मसूर प्रतिनिधी| दादासाहेब काशिद
माझे लग्न करून का देत नाही, तसेच भावाच्या मिळकतीमध्ये वाटणी देत नाही कारणावरून मसूर येथील एका दिवट्याने आपल्या जन्मदात्या आई- वडिलांना काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. मंदार दत्तात्रय आफळे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सदर घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंदार याने त्याची आईस तुझे भावाचे सांगली- नागाव येथील जमिनीत वाटणी माग. मला तुझे भावाचे जमिनीत वाटणी हवी आहे, असे म्हणून आईस शिवीगाळ केली. लाथा बुक्क्यांनी व हाताने मारहाण करत असताना, वडील दत्तात्रय आफळे सोडवण्यासाठी आले असता मंदार याने तुम्ही माझे लग्न का करत नाही असे म्हणून वडिलांनाही व आईला काठीने मारहाण करून जखमी केले.
याबाबत मसूर पोलीस दुरुक्षेत्रात आई लतिका दत्तात्रय आफळे यांनी फिर्याद दिली आहे. मंदार हा आई- वडिलांच्या शेतामधून येणाऱ्या उत्पन्नातील काहीही देत नाही. यापूर्वीही अनेक वेळा मंदार हा वेगवेगळी कारणे देऊन आई-वडिलांना मारहाण केल्याचे नमूद केले आहे. माझ्या पतींना व मला मारहाण करणाऱ्या आमच्या मुलाचा त्रासापासून कायमची मुक्तता करावी असे तक्रारीत नमूद केले आहे. अधिक तपास मसूर पोलीस करीत आहेत.