तारळेत भिमकुंती यात्रेची उत्साहात सांगता

पाटण : शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या येथील परंपरागत भिमकुंती यात्रेची सांगता “कुंती माता की जय, भीमसेन महाराज की जय” च्या गजरात व गुलालाची उधळण करत दोन्ही मुर्तींचे तारळी नदीत विसर्जनाने झाली. मिरवणूक सुरू होण्यास अन पावसाने हजेरी लावण्यास एकच गाठ पडली. त्यामुळे श्रीं च्या मूर्तीवर वरुण राजाच्या कृपेने एक प्रकारे जलाभिषेकच झाला. तसेच भविकही ओले चिंब झाले होते. गुलाल व पाऊसात तरुणाई माखून गेली होती. अतिशय उत्साहात व भावपुर्ण वातावरणात श्रीं ना निरोप देण्यात आला.
खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे काल दिवसाचं जाधव भावकीच्या मानाच्या उदबत्ती झाडाची मिरवणुक संपन्न झाली. दुपारी एक वाजता झाड उत्सव मंडपात पोहोचल्यावर महाआरती झाली नंतर महाप्रसादाने रविवारीच्या कार्यक्रमाची सांगता झाली. दिवसा मिरवणूक झाल्याने नेहमीसारखा उत्साह जाणवला नाही. मात्र कालची कसर आज भीमसेन महाराजांच्या मिरवणुकीत भरून काढली. आज सकाळी कुंती मातेची सवादय मिरवणुक गावातुन निघाली. घरोघरी सुहासिनींनी खणा नारळाने कुंती मातेची ओटी भरली. कुंती माता चार वाजता उत्सव मंडपात पोहोचली, तेथे कुंती माता व भीमसेन या मातापुत्राची भेट झाल्यावर मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.
भीमसेन महाराज व कुंती मातेच्या जयजयकारात, पारंपरिक वाद्यांच्या साथीने व गुलालाची उधळण करत मिरवणुक मार्गस्थ झाली. मिरवणूक दरम्यान पावसाने हजेरी लावली होती. पावसाने वातावरण आल्हाददायक झाले होते. सर्वात आधी माता कुंतीचे पुलाच्या दक्षिण बाजूला विसर्जन झाले व पुलाच्या उत्तर बाजूला सायंकाळी साडे सहा वाजता आरती होऊन भीमसेन महाराजांचे तारळी नदीत विसर्जन झाले. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे शिस्तीत मिरवणुक पार पडली. यावेळी उंब्रज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे स्वतः जातीने हजर होते. त्यांनी मिरवणूक मार्गातील शिस्त अबाधित राखली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर खबाले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कुंती माता की जय, भीमसेन महाराज की जय च्या जयजयकाराने परीसर दुमदुमुन गेला होता.