राज्य मार्गावर पाटण पंचायत समितीचा कर्मचारी अपघातात ठार : 1 जखमी
कराड | मल्हारपेठ- पंढरपूर राज्य मार्गावर उंब्रज- मसूर जाणाऱ्या रोडवर ट्रकला पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एकजण ठार झाला असून आणि एक जखमी झाला आहे. अपघातातील दोघेही पाटण पंचायत समितीचे कर्मचारी आहेत. सोमवारी सकाळी नऊ वाजता वडोली भिकेश्वर (ता.कराड) गावच्या हद्दीत शशीधन पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, उंब्रज- मसूर रोडवर सोमवारी सकाळी वीट भट्टी वरून एक ट्रक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होता. त्यासुमारास पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या यामा दुचाकी ट्रकवर जोरदार आदळली. या अपघातात दुचाकी चालक रवी कुमार नारायण लोहारो (वय- 41, रा. पुसेसावळी, ता. खटाव) हा गंभीर जखमी होवून ठार झाला. तर सिद्धेश्वर रणदिवे हा जखमी झाला आहे.
ट्रक चालक व तेथील नागरिकांनी अपघातानंतर जखमींना उपचारासाठी कराड येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच रवी लोहारे हा मृत झाल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाले असून पुढील तपास सहाय्यक फौजदार मुळीक करत आहेत.