चाफळ विभागात 2 ठिकाणी छऱ्याच्या बंदुकीने गोळीबार : एक कुत्रा ठार तर दोन जखमी

चाफळ | चाफळ विभागातील गमेवाडी व वागजाईवाडी याठिकाणी रात्रीच्या वेळी ओमनी गाडीतून आलेल्या अज्ञातांनी रस्त्यावर उभे असलेल्या पाळीव कुत्र्यावर छऱ्याच्या बंदुकीने गोळी झाडल्याने गमेवाडी येथे एक कुत्रे जागीच ठार झाले. तर वाघजाईवाडी येथील दोन कुत्री गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने परिसरात एकच घबराट निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वागजाईवाडी येथील ओंकार संजय महिपाल यांच्या मालकीचे पाळीव कुत्रे रात्रीचे वेळी घराबाहेर बसले होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या ओमनी गाडीतून आलेल्या अज्ञात लोकांनी घराबाहेर बसलेल्या पाळीव कुत्र्यावर गाडीतूनच छऱ्याच्या बंदुकीने गोळीबार केला. तर एका मोकाट कुत्र्यावरही गोळ्या मारल्या. यामध्ये हे दोन्ही कुत्री जखमी झाली आहेत. तर याच विकृत अज्ञातांनी गमेवाडी येथील संतोष तिकुडे यांच्या कुत्राला गोळी घालून ठार मारले. या प्रकारामुळे ग्रामस्थांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली आहे. तर मृत कुत्र्याचा वैद्यकीय पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल घाडगे यांनी केला आहे. चाफळ विभागात प्रथमच असा प्रकार घडल्याने परिसरात रात्रीच्यावेळी शिकारी राजरोसपणे फिरत असल्याचे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पोलीस व वनविभागाने सांघिकरित्या तपास केल्यास गोळ्या झाडणारे हाती लागतील, त्यादृष्टीने प्रयत्न करून अज्ञातांचा शोध लावावा, अशी मागणी विभागातील जनतेतून केली जात आहे.