प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) गणपतीच्या मूर्तींवर बंदी
सातारा | पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांनी दि.12/05/2020 रोजी पारीत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्याही विषारी, अजैविक कच्चा माल (जसे की, पारंपारिक चिकणमाती आणि माती तसेच प्लास्टिक आणि थर्माकोल (पॉलीस्टीरिन) विरहित नैसर्गिक, जैव-विघटनशील, पर्यावरणास अनुकूल असलेल्या कच्च्या मालापासून बनवलेल्या मूर्तींना प्रोत्साहन/अनुमती देण्यात यावी. प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) च्या मूर्तींवर बंदी घालण्यात यावी, असे सूचविण्यात आलेले आहे. तसेच ही मार्गदर्शक तत्त्वे धार्मिक उत्सव साजरे करताना नैसर्गिक जलस्रोतांच्या गुणवत्तेवर व पर्यावरणावर कोणताही परिणाम न होता पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत. तसेच या बाबत मुबई उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल झालेले आहे. ही बाब न्याय प्रविष्ठ आहे.
सदस्य सचिव, म.प्र.नि.मंडळ, मुंबई यांनी सर्व जिल्हाधिकारी व नगरपालिका/नगरपंचायत यांना पत्रान्वये पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती बनविणे व विक्री करणेस प्रतिबंध करणेबाबत कळविण्यात आलेले आहे. तसेच या कार्यालयाने देखील दि.27/01/2022 रोजीच्या पत्रान्वये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प), जि.प.सातारा व जिल्हा नगर प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांना कळविलेले आहे. जिल्हाधिकारी सातारा यांच्या कडील दि.24/06/2022 रोजीच्या आदेशान्वये पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती बनविणे व विक्री करणेस प्रतिबंध करण्यात आलेले आहे.
जिल्हाधिकारी सातारा यांनी दि.09/07/2022 रोजीच्या अदेशान्वये दि.24/06/2022 रोजीच्या आदेशामध्ये अंशता बदल करुन 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सातारा जिल्हयातील कुंभार समाजाकडे विक्रीसाठी तयार असणाऱ्या पी.ओ.पी. च्या मूर्ती वितरण/विक्री करणेस मुभा देण्यात आलेली होती. परंतु तदनंतर म्हणजेच दिनांक 01/09/2022 पासून सातारा जिल्हयामध्ये पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व प्रकारच्या मूर्ती बनविणे, आयात करणे, वितरण करणे, खरेदी व विक्री करणेस प्रतिबंध केलेला आहे. तसेच सदर आदेशान्वये पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती बनविणे व विक्री करणेस प्रतिबंध करण्यात आल्याने या कार्यालयाकडून मुख्याधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सातारा यांना सदर आदेशाची कडेकोट अंमलबजावणी करण्याबाबत कळवण्यात आले आहे.