पोक्सोंचा गुन्हा : एसटी बसस्थानकात मुलींची छेडछाड काढणाऱ्या क्लार्कला बेदम चोप
सातारा – सातारा बसस्थानकामध्ये युवतीला छेडछाड केल्याच्या प्रकारातून महिलांनी सातारा एसटी बस आगारातील क्लार्कला बेदम चोप दिला. या घटनेची नोंद सातारा पोलीस ठाण्यात झाली असून पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अविनाश जगदेश राठोड (रा. दाैलतनगर, सातारा) असे संशयित क्लार्कचे नाव आहे.
दरम्यान, युवतीची गुरूवारी छेड काढल्यानंतर ती घाबरली. तिने घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानुसार छेडछाड काढणारी व्यक्ती नेमकी कोण ? हे पाहण्यासाठी शुक्रवारी संबंधित व्यक्तीवर वॉच ठेवण्यात आला. सायंकाळी संबंधित संशयित व्यक्ती दिसताच त्याच्यावर तुटून पडले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. चोप देणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. नेमके काय झाले आहे याचा कोणालाच अंदाज येत नव्हता. चोप दिलेला व्यक्ती एसटी विभागात क्लार्क असल्याचे समोर आले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून सर्वांना शांततेचे आवाहन केले. जखमी व्यक्तीला ताब्यात घेऊन उपचारासाठी पाठवण्यात आले. दरम्यान, छेडछाड करणाऱ्या दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जमावाकडून होत होती. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमीला पोलिस चौकीत घेवून गेल्यानंतर तेथेही संतप्त जमावाने त्याला चोप दिला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला शांततेचे आवाहन केले.