आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने पोलादपूर- महाबळेश्वर मार्ग बंद
सातारा | प्रतापगड पासून काही अंतरावर असणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री (दि. 27) दरड कोसळली असून या दुर्घटनेमुळे दगड व माती रस्त्यावर आल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. तेव्हा दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी ताम्हेणी घाटातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा.
पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंट जवळ दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आंबेनळी घाट दोन्ही बाजूंकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. प्रतापगड रेस्क्यू टीम सदस्यांसह स्थानिकांच्या मदतीने दरड हटविण्याचे काम सुरु आहे. मंगळवारी (दि. 27) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली आहे.
दगड व माती हटविल्यानंतर वाहतूक पुर्ववत सुरु होईल अशी माहिती देण्यात आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही. पोलादपूर कडुन महाबळेश्वर कडे जाणारा आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंट जवळ दरड कोसळली असल्याने आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. प्रवाशांनी ताम्हेणी घाटातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.