चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष : सातारा जिल्ह्यातील वडूथ गावात बॅंनर झळकले
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलनं सुरू आहेत. सातारा जिल्ह्यातील वडूथ गावात मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी असल्याचे फलक लावण्यात आले असून हे फलक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष” मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्यास गावात प्रवेश नाही, त्यामुळे आपली मान मर्यादा राखुन गावात प्रवेश करावा. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाचे गावात बॅंनर लावू नये, असा मजकूर असलेले भलेमोठे बॅंनर मुख्य चाैका- चाैकात लावले असून ते लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
सकल मराठा समाज वडूथ गावच्या वतीने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्या पदाधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंदी वडूथ गावात करण्यात आल्याचे बॅंनर लावले आहेत. तसेच मराठा आरक्षण मिळेपर्यंत आगामी काळातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची नोटही बॅंनरवर लिहली आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात गेल्या महिनाभरापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षण मागणी साठी उपोषण सुरु होते. त्यानंतर आता जरांगे पाटील राज्यभर दाैरे करत असून कालच सातारा जिल्ह्यातील दहिवडी व फलटण येथे जाहीर सभा झाल्या. त्यानंतर आज सातारा जिल्ह्यातील वडूथ गावाने बॅंनर झळकवत पाठिंबा दिला आहे. मराठा आरक्षणाचे राज्यात तीव्र पडसाद उमटत असून मराठा समाजाचा आरक्षण मागणीचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.
राज्यात मराठा आरक्षणाची वाढती मागणी लक्षात घेता संपूर्ण राज्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची मोठी अडचण झाली आहे. अनेक ठिकाणच्या राजकीय नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस राज्य सरकारवर मराठा समाजाचा दबाव वाढत आहे. मनोज जरांगे पाटील हे देखील राज्यव्यापी दौरा करत आहेत. मराठा समाजाच्या भव्य सभा घेत लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या वतीने शासनाकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे.