कॅथलॅब स्थलांतर प्रश्नावर पृथ्वीराज बाबा अलर्ट ः थेट मुख्यमंत्र्याकडे केली मागणी
कराड :- कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात कॅथलॅब सुरु करण्याचा निर्णय मागील काही महिन्यापूर्वी शासनाने घेतला होता. पण दोन दिवसापूर्वी शासन आदेश काढून कॅथलॅब सातारा जिल्हा रुग्णालयात स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तो निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा याबाबत पत्र माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना दिले आहे.
या पत्रात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी व सूचना केली आहे कि, कराड येथे उपजिल्हा रुग्णालय असून शासनाच्या कॅथलॅब स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे कऱ्हाडसह, सातारा, खटाव, वाळवा, शिराळा, कडेगाव, पाटण या सात तालुक्यांतील रुग्ण उपचाराला मुकणार आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांसह वृद्धापकाळाने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूचे प्रमाण वाढत आहेत या रुग्णांसाठी कॅथलॅब ची गरज लक्षात घेता, कराड उपजिल्हा रुग्णालयातील मंजूर कॅथलॅब स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने मागे घेण्यात यावा.
कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात कॅथलॅब च्या माध्यमातून माफक दरात हृदय रुग्णांवर अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी झाली असती. याचा फायदा हजारो गरजू रुग्णांना झाला असता. कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात कॅथलॅब सुरु करण्याबाबत शासनाने मागील काही महिन्यात मंजुरी दिली, त्यानुसार जागा निश्चितीसाठी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी सुद्धा केली. व त्यानुसारच कराड उपजिल्हा रुग्णालयाकडून रुग्णालय परिसरातील जागा निश्चिती करून त्यासाठी एआरटी सेंटरची सन १९६२ ची जुनी इमारत निर्लेखित करून ती जागा कॅथलॅब साठी उपलब्ध होऊ शकते याबाबतचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांच्याकडे पाठविण्यात आला होता. हि प्रक्रिया सुरु असतानाच दोन दिवसापूर्वी १४ मार्च २०२४ रोजी शासनाच्या आरोग्य विभागाकडून कराड उपजिल्हा रुग्णालयातील कॅथलॅब सातारा जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करणार असल्याचा शासन आदेश प्रसिद्ध झाला.
शासनाने घेतलेला निर्णय परिसरातील रुग्णांच्या दृष्टीने गरसोयीचा आहे. राज्य शासनाने जिथे कॅथलॅब तसेच वैद्यकीय महाविद्यालये नाहीत अशा १९ ठिकाणी “Turn Key Basis” वर कॅथलॅब उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्याकडून उपलब्ध झालेल्या रु. २३१ कोटी एवढी रक्कम कॅथलॅब करीता वापरण्यास विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली होती. सदर मंजूर १९ कॅथलॅब पैकी सिंधुदुर्ग व कराड येथील कॅथलॅब स्थलांतर करण्याचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्या शासन आदेशामुळे कराड शहर व परिसरातील जवळपास सहा तालुक्यातील रुग्णांना माफक दरात मिळणाऱ्या उपचार सुविधेला मुकणार आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील व सातारा जिल्ह्याच्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या कराड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील असलेली कॅथलॅब सुविधा स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा.