Prithviraj Chavan : गणपती बाप्पाकडं केली प्रार्थना म्हणाले… राज्यावर विघ्न
कराड | आज गणेश चतुर्थीच्या दिवशी कराड येथील आमच्या घरी कुटुंबियांसमवेत गणपतीची स्थापना केली. महाराष्ट्रात तसेच देशात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव हा धार्मिक कार्यक्रम असला तरी त्याहून हा कार्यक्रम सांस्कृतिक व सामाजिक झालेला आहे, हा उत्सव म्हणजे ऐक्याचे व बंधुत्वाचे प्रतीक आहे. यानिमित्त मी गणरायाकडे प्रार्थना करतो कि, महाराष्ट्राच्या जनतेला सुख समृद्धी लाभावी, संकटाचे काळे ढग जे दिसतायत ते दूर होऊदे, दुष्काळाची परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी दिसत आहे, यामध्ये लोकांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जितक्या लवकर पाऊस पडेल तेवढा पिण्याच्या व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील-देशातील माझ्या सर्व बांधवांना व त्यांच्या कुटुंबियांना माझ्या वतीने शुभेच्छा देतो. येणारे वर्ष उत्साहाचे, आनंदमय जावो अशी विघ्नहर्त्याकडे प्रार्थना करतो. लवकर पाऊस पडला तर पिण्याचा प्रश्न मिटेल. तेव्हा गणरायाकडे पाऊस पडू दे आणि राज्यावरील विघ्न दूर होवू दे, अशी प्रार्थना केल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
कराड येथील आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी नव्या संसद भवन विषयी श्री. चव्हाण म्हणाले, आज नव्या ससंद भवनात जाण्याचा दिवस मोदींनी निवडलेला आहे. हिंदू धर्मातील एक शुभ दिवस आहे. कधीना कधी संसद भवनाच्या बसण्यासाठीच्या जागा वाढवणं गरजेचे होते. आज विद्यमान खासदारांना प्रवेश दिला जाईल. पंतप्रधानांनी ५ दिवसाचं अधिवेशन का बोलावलं यांची थोडी माहिती दिली आहे, त्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. अचानक काही विधेयके मांडली जातील. स्वातंत्र्यापूर्वीची जुनी संसद आहे. त्या संसदेत इतिहास घडला. स्वातंत्र्याच्या मध्यरात्रीचे १९४७ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऐतिहासिक भाषण केलेलं आहे. त्या दिवसापासून स्वतंत्र भारताच्या इतिहासाला सुरूवाती झाली. याच सभागृहाने संविधान दिलं. माझ्या अनेक आठवणी जुन्या संसद कार्यालयाशी आठवणी जुळलेल्या आहेत. २००१ साली झालेला पाकिस्तानी अतिरेक्यांचा हल्ला हाही इतिहासात नोंद करण्याजोगी आहे. पुढील २५ वर्षात लोकशाही अधिक बळकट होईल की तिला घरघर लागेल हा खरा प्रश्न आहे. त्याचं उत्तर मे २०२४ मधील लोकसभेच्या निवडणूकीत या देशातील जनता देईल.
राज्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मी मुख्यमंत्री यांच्याकडे 1 महिन्यापूर्वी जनावरांच्या छावण्या सुरू करण्यासाठी मागणी केली होती. शेतीची पिके हातून गेली आहेत. आता पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो. त्यामुळे मी मागणी केली होती, परंतु त्याकडे अद्याप लक्ष दिले नाही. तर काही ठिकाणी लोकांना पिण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, ते पाणी स्वच्छ दिले जावे अशी मागणी केली होती, असे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.