पाटणला पर्यावरण संवर्धनासाठी कोयनेच्या विद्यार्थ्यांकडून 20 हजार सीड बॉलची निर्मिती
पाटण | निसर्गातील हवा, पाणी, वृक्ष, वनस्पती, जमीन, पशु-पक्षी आणि मानव प्राणी यांच्या नात्यात जेव्हा नैसर्गिक समतोल रहातो तेव्हाच पर्यावरण संतुलित राहू शकते. पर्यावरणीय संतुलन साधण्याची प्रक्रिया व जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. हे ओळखून कोयना एज्युकेशन सोसायटीने पर्यावरण संवर्धन व जागृती मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून कोयना एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये जवळपास 20 हजार सीड बॉलची निर्मिती करून परिसरातील पडीक डोंगरावर ते सीड बॉल टाकण्यात आले.
पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर स्वरूपात पुढे येत आहे. वातावरणातील बदलांमुळे निसर्गाचे चक्र बिघडले आहे. याला सर्वस्व मानव घटकच जबाबदार आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेत या प्रश्नांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटकाचे संवर्धन करणे ही सर्वांची एक सामाजिक जबाबदारी आहे. म्हणूनच कोयना एज्युकेशन सोसायटीने पर्यावरण संवर्धन आणि जागृती मोहीम हाती घेतली आहे. कोयना एज्युकेशन सोसायटीने विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच त्यांच्या मदतीने जवळपास 20 हजार सीड बालची निर्मिती केली आहे.
संस्थेच्या विविध शाखेतील हजारो विद्यार्थ्यांनी या कामात सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावला. संस्थेच्या या उपक्रमाचे समाजातुन कौतुक होत आहे. माती, थोडेसे शेण, छोटे छोटे तुकडे केलेले गवत एकत्र बिया घालून विद्यार्थ्यांनी गोळे तयार केले आहेत. जांभुळ, फणस, चिंच, गुलमोहर, आवळा आदी परिसरात उपलब्ध होणाऱ्या बिया संकलित करुन विद्यार्थ्यांनी हजारो सीडबाल तयार करून परिसरातील पडीक मोकळ्या जागेत तसेच जंगलात माळरानावर हे सीडबॉल टाकले आहेत. नैसर्गिकरित्या या बिया जमिनीत रुजतील. संस्थेचे संचालक याज्ञसेन पाटणकर यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
वनविभाग, निसर्ग मित्र, ग्रामपंचायतीची मदत
कोयना एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये जवळपास 20 हजार सीड बॉलची निर्मिती केली असून ते आम्ही परिसरातील पडीक डोंगरावर टाकत आहोत. या सर्व उपक्रमात मुलांना सामावून घेत आहोत. यामुळे मुलांना पर्यावरण विषयी आवड निर्माण व्हावी आणि नैसर्गिक पर्यावरण हा सजीवांसाठी अनमोल ठेवा आपण पुढील पिढ्यांसाठी व्यवस्थित जतन होईल. या उपक्रमासाठी वनविभाग, निसर्ग मित्र, स्थानिक ग्रामपंचायत याची मदत घेणार असल्याचे कोयना एज्युकेशन सोसायटी संचालक याज्ञसेन पाटणकर यांनी सांगितले.