सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सरकारकडून दूधाला दर मिळावा, यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. गेल्या आठवड्यात पुसेगाव येथेही दूध रस्त्यावर अोतून ठाकरे गट आणि दूध उत्पादकांकडून आंदोलन करण्यात आले होते. तसेच दूधाला 40 रूपये दर मिळावा, अशी मागणीही केली होती. मात्र, सरकारकडून कोणताही निर्णय होत नसल्याने आज पुणे- बेंगलोंर महामार्गावर वाढे फाटा येथे मुंबई- पुण्याला जाणारे दूधाचे टॅंकर ठाकरे गटाने आडविण्यात आले. ठाकरे गटाच्या या आक्रमतेमुळे काही काळ महामार्गावर पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली.
शासनाने दूध दरवाढीचा बाबत योग्य निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाट्याजवळ महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणारे दुधाचे टँकर अडवून ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. दूधाच्या भुकटीला 60 रूपये दर मिळत असताना, आमच्या शेतकऱ्याच्या दूधाला 40 रूपये दर मिळत नाही. सरकारने दूध उत्पादकांच्या मागणीचा विचार लवकरात लवकर करावा. अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.
सातारा जिल्ह्यात निष्क्रीय लोकप्रतिनिधी आहेत. शासनाने दुधाचे भाव कमी केल्यामुळे याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या गाईचे दर 26 ते 27 रुपये प्रति लिटर असून 40 रुपये प्रति लिटर भाव मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. अधिवेशनात दूध दराचा प्रश्न घ्यावा, अन्यथा त्याविरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी दिला आहे.