कोकणातून कराडात जेवायला थांबलेल्या कारमध्ये अजगर : सीसीटीव्हीत कैद
कराड | कराड येथे एका चारचाकी गाडीतून आलेल्या अजगराला वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्राने सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. कराडच्या शिवराज ढाब्यावर रत्नागिरी येथून आलेल्या कुटुंबीयांच्या गाडीच्या बोनेटमध्ये अजगर दिसून आला. त्यानंतर कराड येथील सर्पमित्र उदीत कांबळे यांच्यासह अजय महाडिक, रोहित कुलकर्णी, योगेश शिंगण यांनी अजगराला सुरक्षितरित्या अधिवासात सोडले.
कोकणातून कारमधून पुण्याला निघालेले कुटूंब मध्यरात्री कराडात येथे हॉटेलात जेवण करण्यासाठी थांबले होते, जेवण झाल्यानंतर कारमध्ये बसायला गेले. चालकाने कारचे बोनेट उघडताच सर्वांना धक्का बसला. कारण बोनेटमध्ये चक्क एक अजगर ठाण मांडून बसलेला. या प्रकारामुळे हादरलेल्या संबंधित कुटूंबियांनी हॉटेलच्या सुरक्षारक्षकाला याबाबतची माहिती दिली. सुरक्षारक्षकाने हॉटेलमधील विशाल विधाते या कर्मचाऱ्याला त्याठिकाणी बोलवले. विशालने तातडीने याबाबतची माहिती सर्पमित्र उदित कांबळे यांना दिली. सर्पमित्र कांबळेही मध्यरात्री त्याठिकाणी धावून गेले. त्यांनी कारमधून सुरक्षितरीत्या त्या अजगराला बाहेर काढून एका पोत्यात ठेवले.
तसेच याबाबतची माहिती वन विभागाचे उपवनसंरक्षक तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना देत त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्र व वराडे येथील वनपाल सागर कुंभार यांनी अजगरास सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडले. या घटनेनंतर संबंधित कुटूंब पुन्हा कारमध्ये बसण्यासही घाबरत होते. मात्र, सर्पमित्र उदीत कांबळे यांच्यासह इतरांनी सर्व कार तपासून त्यामध्ये दुसऱ्या कोणत्याच जागी सर्प नसल्याची खात्री करुन घेत संबंधित कुटूंबियांना निर्धास्त केले. त्यानंतर ते कुटूंबिय पुढील प्रवासाला मार्गस्थ झाले.