कोल्हापूरात पुन्हा राडा : इंटरनेट सेवा बंद, पोलिसांचा हिंदुत्वादी आंदोलकांवर लाठीचार्ज
कोल्हापूर । कोल्हापूर शहर बंदची आज हिदुत्वादी संघटनांनी हाक दिली होती. या बंदच्या दरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असून आंदोलकांना पागविण्यासाठी अश्रूधूरांचा वापर करण्यात आला आहे. तर कोल्हापूरात इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. काल शिवराज्यभिषेक दिना दिवशी (दि. 6) कोल्हापूरात सात मुस्लिम तरूणांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून राडा झाला होता. या पार्श्वभूमीवर आज हिदुत्वादी संघटनानी कोल्हापूर शहर बंद ठेवण्याची हाक दिली होती.
आज कोल्हापूरात हिंदुत्ववादी संघटनांनी जमावबंदीचे आदेश झुगारून एकवटल्या. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र आले. जमाबंदी आदेश आणि पोलिसांनी बंद मागे घेण्याचं केलेलं आवाहन झुगारून हे आंदोलन करण्यात आलं. मात्र, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोर्चाच्या ठिकाणी प्रचंड मोठा बंदोबस्त ठेवला होता. तसेच जिल्ह्यातील संवेदनशील भागातही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध नोंदवला. सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसेच औरंगाबादेत औरंगजेबाचा फोटो फडकवणाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात आंदोलकांनी भगवे फेटे आणि भगवे शेले घातले होते. जमाव मोठ्या प्रमाणावर जमला होता. जोरजोरात घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांनी त्यांना दाद दिली नाही. उलट आंदोलक अधिकच आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.
पोलिसांनी लाठीमार करताच आंदोलक अधिकच आक्रमक झाले. यावेळी एक आंदोलक तर थेट पोलिसांच्या गाडीवर चढला होता. पोलिसांच्या लाठीमारामुळे एकच गोंधळ उडाला. त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. काही आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना लाठीचा मार दिला. त्यामुळे आंदोलकांची एकच पळापळ सुरू झाली. दिसेल तिथे आंदोलक पळत होते. आंदोलक सैरभैर पळत असताना पोलीसही त्यांच्या मागे जाऊन त्यांना लाठीचा प्रसाद देत होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
नक्की काय आहे कोल्हापूरचं प्रकरण
काल शिवराज्यभिषेक दिना दिवशी (दि. 6) कोल्हापूरात मुस्लिम तरूणाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून राडा झाला होता. मुस्लिम 7 तरूणांनी ‘बाप तो बाप’ अशा आशयाचे आैरंगजेब आणि अफझलखान यांचे स्टेटस ठेवले होते. या स्टेटसवरून हिदुत्वादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.शहरातील दसरा चाैकात दगडफेक करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हिदुत्वादी संघटनानी कोल्हापूर शहर उद्या बंद ठेवण्याची हाक दिली आहे.