सिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरात रथोत्सवास : लाखो भाविक, गुलालाची उधळण
सातारा प्रतिनिधी| वैभव बोडके
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथाची यात्रा उत्साहात पार पडली. दुष्काळी भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे. सिद्धनाथाच्या नावाने चांगभलच्या” गजरात गुलाल खोबर उधळत श्री सिध्दनाथाची आणि देवी जोगेश्वरीची म्हसवडमधून रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राज्यातूनच नव्हे तर परराज्यातील सुमारे पाच लाखाहून अधिक भाविक या यात्रेत दर्शनासाठी म्हसवड मध्ये सहभागी झाले आहेत.
श्री सिध्दनाथ व जोगेश्वरी हे देवस्थान नवसाला पावणारे असल्यामुळे बाहेरून नवस फेडायला येणारे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. विवाह सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. या निमित्ताने म्हसवडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सिद्धनाथाच्या नावानं चांगभल…च्या जयघोषात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण करीत रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
रथाची नगर प्रदक्षिणा भाविकांनी सिद्धनाथाच्या नावाने चांगभलंच्या गजरात रथावर गुलाल व खोबऱ्याची उधळण करत सुरू केली. अनेक भक्तांनी निशाने, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली. अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली होती. रथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाल्यानंतर उजवी प्रदक्षिणा घालून रथ बायपास रस्त्याने नवीन नगरपालिका, महात्मा फुले चौक व तसेच पुढे बसस्थानक चौकातून सातारा-पंढरपूर रस्त्यावर ओढत आणला. तेथून पुढे श्री सिद्धनाथ यांच्या बहिणीस मानकऱ्यांच्या हस्ते साडी-चोळी यांचा आहेर करण्यात आला. याच ठिकाणी नवसाची मुले रथावरुन खाली टाकण्यात आली व नवस फेडण्यात आली. त्या नंतर रथ वाघजाई ओढ्यातून पुढे कन्या विद्यालय, श्री लक्ष्मीआई मरीआई मंदिर मार्गावरून रथाने नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.