तांबवे जिल्हा परिषद शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांकडून गाैरव
कराड | तांबवे येथील जिल्हा परिषद शाळेच्या 1992-93 सालच्या चाैथीच्या बॅंचने आजी-माजी गुरूवर्यांचा सत्कार केला. तसेच शाळेला आणि अंगणवाडीला खुर्च्या देण्याचा कार्यक्रम पार पडला. आजकाल दहावीच्या बॅंचेस माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करत असतात, परंतु पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या शाळेत माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा गाैरव केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक बळवंतराव साठे उर्फ बाबा गुरुजी हे उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण कांबळे, भगवान पाटील, सुमनबाई पाटील, सुभाष गरुड हे सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते. तर शाळेचे ‘मुख्याध्यापक अशोक देसाई आणि त्यांचे सर्व शिक्षक सहकारी, अंगणवाडीच्या सर्व सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या.
बळवंतराव साठे म्हणाले, आजपर्यंत आम्ही माजी विद्यार्थी मेळावा हा केवळ दहावी अन् त्यानंतरच्या वर्गाचा होतो हे पाहिले होते. परंतु, पहिल्यादांच आम्हांला जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनाही हा सुखद अनुभव विद्यार्थ्यांनी दिला. आजपर्यंतच्या आयुष्यातील पहिला असा कार्यक्रम आम्ही अनुभवत आहोत. या एका दिवसामुळे कित्येक वर्षांनी या शाळेत आणि खुर्चीवर बसायला मिळाले, यांचा आनंद न सागण्यासारखा आहे.
माजी शिक्षक स्वर्गीय राऊत बाई, स्वर्गीय जमाले बाई, स्वर्गीय हनमंत साठे- गुरुजी यांना या कार्यक्रमावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक देसाई, मोरे मॅडम, धुमाळ मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सतीश यादव यांनी केले. तर विक्रम पवार यांनी आभार मानले.