कराडला 2 लाख 50 हजार रूपयांची मॅरेथाॅन
एस. बी. फाऊंडेशन आयोजक
कराड | कराड तालुक्यातील विजयनगर ते साकुर्डी या मार्गावर 8 सप्टेंबर रोजी एस. बी. फाउंडेशनने आयोजित केलेल्या कराड 10 के मॅरेथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या ऑनलाइन नाव नोंदणी आणि टी-शर्टचे अनावरण करण्यात आले.
स्पर्धेच्या टी-शर्टचे अनावरण कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, कराड आरटीओ ऑफिसचे अधिकारी चैतन्य कणसे, विजयनगर येथील एमएससीबीचे डेप्युटी एक्झिक्यूटिव्ह अमित अदमामे, उद्योजक बाळासाहेब कुलकर्णी, सुनील बामणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी राज्यासह परराज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावर्षी 8 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मॅरेथाॅनसाठी 2 लाख 50 हजार रूपयांच्या रोख रक्कमेसह टी- शर्ट, मेडल, प्रमाणपत्र, देण्यात येणार असून नाष्टा आणि पाण्याची सोय आयोजकांकडून करण्यात येणार आहे. मॅरेथाॅन चार गटात आयोजित करण्यात आली असून 14 ते 18 या वयोगटातील पुरूष आणि महिला गटातील विजेत्यांना 5 हजार, 3 हजार आणि 1 हजार 500 रूपयांचे रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे.
वयोगट 18 ते 35 मधील महिला व पुरूष विजेत्यांना 20 हजार, 15 हजार आणि 10 हजार रोख रक्कम तर 35 ते 45 आणि 45 ते 55 गटातील विजेत्या महिला आणि पुरूषांना 11 हजार, 7 हजार आणि 5 हजार अशी रोख रक्कमेची बक्षीसे देण्यात येतील. तर 55 गटावरील खुल्या गटातील पुरूष आणि महिला विजेत्यांना 7 हजार, 5 हजार आणि 3 हजार अशी रोख रक्कमेची बक्षीसे देण्यात येणार असल्याचे संयोजक सुनिल बामणे, डाॅ. फासे यांनी सांगितले.