सॅल्युट सातारा पोलिस : महामार्गावरील दरोड्यातील 20 लाखांचा मुद्देमाल फिर्यादीला मिळाला

सातारा | पुणे- बंगळूर महामार्गावर मध्यरात्री कुरिअर गाडीला दुचाकी आणि इनोव्हा गाडी आडवी मारून अज्ञात 9 दरोडेखोरांनी दोघांकडून सुमारे 17 लाख 62 हजार किमतीचे एकूण 110 ग्रॅम सोन्याचे दागिने व 17 किलो चांदीचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीना अटक करून चोरीला गेलेला मुद्देमाल व रक्कम जप्त केला होता. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादीला न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुन्हा मिळवून दिला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काशिळ (ता. जि. सातारा) गावच्या हद्दीत दि. 28 मे 2023 रोजी रात्री 12.10 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून बोलेरो गाडी क्रमांक (MH-43- BP-8427) ही जात असताना. इनोव्हा कार क्रमांक (MH-06- BM- 3715) मधील चालकाने अचानक आडवी मारुन गाडी थांबवली. इनोव्हा कारमधुन अनोळखी इसम व दुचाकीवरून आलेले अनोळखी इसमांनी फिर्यादी संतकुमारसिंग पुरणसिंग परमार व साक्षीदार गोलुसिंग दिनेशसिंग परमार यांच्या तोंडावर स्प्रेचा फवारा मारुन जबरदस्तीने खाली उतरवले. त्यांच्या ताब्यातील सुमारे 17 लाख 62 हजार किमतीचे एकूण 110 ग्रॅम सोन्याचे दागिने व 17 किलो चांदीचे दागिने असलेल्या कुरिअर पार्सलचे बॉक्स जबरदस्तीने हिसकावून नेले. याबाबतची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल होती. या गुन्ह्यातील अनोळखी 9 आरोपींचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकाऱ्यांनी शोध घेत असताना आरोपीची गोपनिय माहिती मिळवून त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. तसेच आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल 19 लाख 84 हजार 255 रुपयांचा किंमतीची 127 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 18.700 किलोग्रॅम चांदीचे दागिने हा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर फिर्यादी संतकुमारसिंग पुरणसिंग परमार व साक्षीदार राजकिशोर मास्टरसिंह परमार (रा. रैवियापुरा ता. बसेडी जि. धौलपुर राज्य राजस्थान, सध्या रा. 216, भेडीगल्ली, शिवाजी चौक, कोल्हापुर) यांच्या ताब्यात देण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपाधीक्षक किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे, पो.कॉ. विशाल जाधव, मुद्देमाल कारकुन म.पो.ना. नम्रता जाधव, मोना निंबाळकर यांनी केली आहे.



