अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार : लोकांच्या गर्दीमुळे पोलिस बंदोबस्त
वाळवा | ऐतवडे खुर्द- चिकुर्डे (ता. वाळवा) येथील रस्त्यावरती देवर्डे गावाजवळ अज्ञात वाहनाचा धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या परिसरातील शेतकऱ्यांना ही घटना निदर्शनास आली. पूर्ण वाढ झालेला अंदाजे तीन वर्षाचा नर जातीचा हा बिबट्या आहे.
गेल्या काही महिन्या पासून वाळवा तालुक्यातील वारणा पट्यात ऐतवडे खुर्द, चिकुर्डे, देवर्डे, करंजवडे परिसरात बिबट्यांचा मोठा कळपच शेतकरी वर्गाला सातत्याने दिसत होता. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्यात तसेच महिला वर्गात भितीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे याची दखल वन विभागाने घेऊन तातडीने यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही ग्रामपंचायत द्वारे केली होती.
लोकांच्या मागणीकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाले असुन सध्या या दुर्लक्षामुळेच सदरचा बिबट्या ठार झाला असल्याची चर्चा ग्रामस्थांतून सुरू आहे. बुधवारी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला आहे. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने कुरळप पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले होते.