ड्रग्स प्रकरणातील संजय राऊतांच्या व्हिडिओ क्लिप काढून बघणार : आ. शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
एका जबाबदार नेत्याबद्दल त्यांच्या सहकाऱ्याच्याबद्दल कोणतेही पुरावे नसताना, उचलली जीभ लावली टाळ्याला अशा पध्दतीने प्रसिध्दीसाठी वक्तव्य करणं योग्य नाही. संजय राऊत अस कुठ बोलले आहेत, ते मी व्हिडिओ क्लिप काढून बघणार आहे. जर संजय राऊत आमच्या नेत्यांची नाहक बदनामी करत असतील तर त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू असा इशारा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रग्ज घेणारा खासदार कोण असा सवाल उपस्थित केला होता. त्याच बरोबर शिंदेंच्या राजकीय परिवारातील व्यक्ती ड्रग घेतो, असा खळबळजनक आरोप केल्यानंतर आज उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्या वर जोरदार टीका केली आहे. सातारा येथे पालकमंत्री माध्यमांशी बोलत होते.
आ. शंभूराज देसाई म्हणाले, संजय राऊत यांच्या डोक्यावर आता परिणाम झाला आहे. रोज काहीतरी वेगळं वक्तव्य करत असतात. संजय राऊत येवढे गंभीर आरोप करत असतील तर शिवसेनेच्या प्रचंड रोषाला त्यांना समोर जावं लागणार आहे. एका जबाबदार नेत्याबद्दल त्यांच्या सहकाऱ्याच्याबद्दल कोणतेही पुरावे नसताना, उचलली जीभ लावली टाळ्याला असे पध्दतीने प्रसिध्दीसाठी वक्तव्य करणं योग्य नाही. माझा उलटा सवाल आहे तुम्ही ज्यांची तळी उचलत आहात, ज्यांच्या साठी तुम्ही उर बडवून सांगत आहात. त्या तुमच्या राजकीय जवळीमधले या मध्ये कोण कोण सामील ते आधी शोधून काढा. आमच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आमचे सहकारी नितेश राणे बऱ्याच वेळा संजय राऊत यांच्या जवळच्या लोकांच्या कनेक्शन बद्दल सांगत असतात. त्यामुळे आता मला आज नितेश राणे यांना संपर्क करावा लागले आणि माहिती घ्यावी लागेल. संजय राऊत यांच्या बेदखल वक्तव्य बद्दल आम्ही कठोर कारवाई करू.