सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन महिने पुरेल इतकाच औषध साठा : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
नांदेड मध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत किती प्रमाणात औषध साठा उपलब्ध आहे याचा आढावा घेतला असता. सातारा जिल्ह्यात एक ते दोन महिने पुरेल एवढा औषध साठा असल्याची माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील डोंगरी भागामध्ये औषध पुरवठा करण्यात येणार असून नांदेडमध्ये घडलेली दुर्दैवी दुर्घटना घडू नये. यासाठी साताऱ्यातील आरोग्य विभाग योग्य ती काळजी घेत आहे, असा विश्वास डॉ.युवराज करपे यांनी व्यक्त केला आहे.
सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रात औषध तुटवडा जाणवण्याची परिस्थिती असून काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची वणवा आहे. सातारा, कराड, पाटण, फलटण, वाई, जावली, महाबळेश्वर, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यातपैकी डोंगरी भाग असलेल्या जावली, महाबळेश्वर व पाटण तालुक्यात डोंगरी भागात अनेक सोयी- सुविधाची वणवा आहे. कराड येथे स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय असून तेथे त्याठिकाणी अनेक पदे रिक्त असल्याचे पहायला मिळत आहे. त्याचबरोबर स्वच्छतेचा अभावही दिसत आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी साधन- सामुग्री उपलब्ध आहे, मात्र, तेथे मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. जिल्हा रूग्णालयासह अनेक ठिकाणी पदे रिक्त ही समस्या जिल्ह्यात सर्वच ठिकाणी दिसत आहे. जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील अधिकाऱ्यासोबत लोकप्रतिनिधींचे या गोष्टीकडे लक्ष नसल्याचे दिसत आहे. अनेक पदे रिक्त असताना ती पदे भरले जात नाहीत. जिल्ह्यातील बहुतांशी आरोग्य विभागातील पदे ही कंत्राटी पध्दतीने भरलेली दिसत आहेत. ठेकेदारी पध्दती राबवली गेली असून ठेकेदारांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने कामावर परिणाम होताना दिसत आहे.