पावसाचा जोर मंदावला : आज ऑरेंज अलर्ट, कोयनेत 66. 90 TMC पाणीसाठा
– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्याला आज ऑरेंज तर पुढील दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आला असून कोयना धरणात गेल्या 24 तासात 2.6 टीएमसी पाणीसाठा वाढला असून सध्या धरणात 66. 90 टीएमसी पाणीसाठा आहे. रात्री उशिरा 8.30 वाजता धरणातून 2100 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे कोयना, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासून सातारा जिल्ह्यात तसेच कोयना धरण परिसरात पावसाचा जोर मंदावला आहे.
कोयनेत 66. 90 टीएमसी पाणीसाठा…
कोयना धरणात शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 66. 90 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात कोयनेला- 94 मिलीमीटर, नवजा- 130 मिलीमीटर व महाबळेश्वरला- 95 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 2553, नवजा- 3593 आणि महाबळेश्वरला- 3352 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात प्रतिसेंकद 31 हजार 416 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे.
जिल्ह्यात सरासरी 12.8 मि.मी. पाऊस
सातारा जिल्ह्यात सरासरी 12.8 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 362.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या 40.9 टक्के इतका आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 11.2 (373.6), जावली-मेढा – 23.4(667.1), पाटण -27.2 (694.8), कराड – 9.6 (198.0), कोरेगाव – 4.5 (165.9), खटाव – वडूज – 6.1 ( 129.9), माण – दहिवडी -2.6 (115.4), फलटण – 2.1 (82.8), खंडाळा -2.5 (196.6), वाई -8.8 (278.5), महाबळेश्वर -64.7 (1914.5) या प्रमाणे पाऊस झाला आहे.