सातारा जिल्ह्यात खळबळ : कोळशाच्या भट्टीवर महिलेवर सामूहिक बलात्कार
सातारा | सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एका कोळशाच्या कारखान्यात काम करणाऱ्या कातकरी समाजातील महिलेने 5 जणांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. संबंधित पीडित महिलेने 15 दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचे आपल्या जबाबात म्हटले आहे. या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील पीडित महिलेने साताऱ्यातील फलटण पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. भट्टीमालक बाळू शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर संशयितांची अोळख पटविण्याचे काम सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की सोनवडी बु. येथे बाळू शेख याची लाकडापासून कोळसा बनविण्याची भट्टी असून तेथे कातकरी समाजातील पुरुष व महिला कामगार आहेत. भट्टी कामगार त्याच ठिकाणी खोपी बांधून राहतात. जून महिन्यात संबंधित महिलेवर तिच्या खोपीत रात्रीच्या सुमारास त्या महिलेच्या पतीस बाहेर काढून बाळू शेखसह अन्य काही लोकांनी सामूहिक अत्याचार केल्याचे तिने म्हटले आहे. या प्रकारानंतर तो महिला पती व मुलांसह रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील गावात जाण्यात यशस्वी ठरली. यानंतर तेथे तो आदिवासी समाजासाठी कार्यरत असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकत्यांच्या संपर्कात साधला.
या घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी पीडित महिलेस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व आदिवासी विकास आढाव समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्याकडे नेले. संघटनेच्या माध्यमातून तिला विरार (मुंबई) येथील मांडवी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर तेथे पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळताच त्यांनी तातडीने पीडित महिलेच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारून तिला सातारा येथे आणून तिचा जबाब नोंदविला. यानंतर तिला फलटण येथे चौकशीसाठी आणण्यात आले. यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करून यातील संशयित बाळू शेख यास शिताफीने ताब्यात घेतले. या घटनेतील अन्य इसमांची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.