Satara Firing News : वाई न्यायालयाच्या परिसरात आरोपींवर गोळीबार, पूर्ववैमनस्यातून हल्ला
सातारा । वाई शहरात न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याची घटना झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे यांच्या दिशेने गोळीबार झाल्याने परिसरात पळापळ झाली. सदरील हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वाई- मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यावर वाई न्यायालयात गोळीबार झाला. दोन फायर होऊनही नशिबाने कोणाला दुखापत झाली नाही. घटनेने परिसरात खळबळ उडाल्याने पांगापांगी झाली. घटनेची माहिती समजताच वाई पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली.
सदरची घटना सोमवारी (दि. ७) दुपारी घडली असून गोळीबारच्या घटनेची माहिती समजताच एलसीबीच्या टीमनी संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजत आहे. या घटनेमुळे टोळीचा भडका धुमसत असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे आता पोलिसांनी टोळीवर वचक बसविण्याची गरज असल्याचे दिसू लागले आहे.