कोयनेतील पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट बंद : पावसाने पाठ फिरवली

– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्यात पावसाने पुन्हा पाठ फिरवली असून कोयना धरणात 4 हजार 74 क्युसेस प्रतिसेंकद पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट बंद आज सकाळी बंद केले आहेत. कोयना धरणात सध्या धरणात 82.76 टीएमसी पाणीसाठा आहे. तसेच सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
कोयनेत 82. 76 टीएमसी पाणीसाठा…
कोयना धरणात मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 82.76 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात कोयनेला- 9 मिलीमीटर, नवजा- 6 मिलीमीटर व महाबळेश्वरला- 9 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 3142, नवजा- 4471 आणि महाबळेश्वरला- 4159 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट बंद
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कोयना धरण पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट आज मंगळवारी सकाळी 10:00 वाजता बंद करण्यात आले आल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.



