Satara News : पुणे- बेंगलोर महामार्गावर टँकरच्या धडकेत 2 महिला जागीच ठार, मुलगी जखमी
आनेवाडी टोलनाक्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

सातारा| पुणे -बेंगलोर महामार्गावर आनेवाडी टोल नाक्याजवळ उडतारे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिला जागीच ठार झाले आहेत, तर एक मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. टँकर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे- बेंगलोर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्याजवळ वाहनाच्या प्रतीक्षेत उभे असलेल्या महिलांना टँकरने धडक दिली. टँकर (क्रमांक – GJ-20-V-7473) चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात दोन महिला ठार झाल्या असून त्यांची नावे अद्याप समजली नाहीत. तर सायली दिलीप कांबळे ही मुलगी जखमी झाली आहे. जखमी मुलीस उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातानंतर महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक घनवट व इतर महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार अवघडे, पोलीस हवालदार जाधव व पोलीस नाईक धुमाळ करीत आहेत.