Satara News : अंनिसमुळे अंभेरीतील भोंदूबाबा गजाआड

सातारा | भोंदुगिरीच्या नावाखाली लोकांना फसविणाऱ्या अंभेरी (ता. कोरेगाव) येथील जंगू अब्दुल मुलाणी या भोंदूबाबाला रहिमतपूर पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. त्याच्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आलेल्या तक्रारीच्या आधारे तपास करून रहिमतपूर पोलिस ठाण्यामध्ये महाराष्ट्र अनिष्ट प्रथा आणि नरबळी विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक समीर शेख आणि डॉ. हमीद दाभोलकर यांच्या सहकार्याने अंनिस कार्यकर्ते व रहिमतपूर पोलिसांनी सापळा रचून भोंदू बाबा जंगू मुलाणी पकडले.
याबाबतची अधिक माहिती अशी, आपल्याकडे अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून रहिमतपूर येथील बाजारपेठेत लोकांचे शोषण करण्याचे भोंदूबाबाचे दुकान जोरात सुरू होते. आजूबाजूचे काही लोक त्याचे एजंट म्हणून काम करत होते. सुभाषचंद्र आप्पाजी मदने (रा. रहिमतपूर) यांच्या घरात गेली अनेक वर्षे कौटुंबिक वादविवाद चालू असल्याने त्याला कंटाळून काही मार्ग काढण्यासाठी त्यांना काही लोकांनी जंगू मुलाणी यांच्याकडे जायचा सल्ला दिला होता.
या भोंदूबाबाने त्यांच्या घरातील भांडणे दैवी शक्तीने सोडवतो, असे सांगून त्यांना वेळोवेळी फसविले. मंतरलेले पाणी, मंतरलेली वाळू, अंगारा पाण्यात घालून पिणे असे उपाय सांगितले. त्यात संबंधितांकडून सात हजार रुपये घेतले; परंतु या भोंदूगिरीचा काही फरक न पडल्याने त्यांनी अंनिसकडे अर्जाद्वारे संपर्क केला. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख आणि डॉ. हमीद दाभोलकर यांच्या सहकार्याने अंनिस कार्यकर्ते व रहिमतपूर पोलिसांनी सापळा रचून भोंदू बाबा जंगू मुलाणी यास अटक केली. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक गणेश कड यांनी गुन्हा नोंदवला. या कारवाईत शंकर कणसे, डॉ. दीपक माने, भगवान रणदिवे, मधुकर माने, सीताराम चाळके, सीताराम माने, चंद्रहार माने हे अंनिस कार्यकर्ते, तसेच तुषार काळंगे विआर कोडे या पोलीस कर्मचारी नि सहभाग घेतला पोलीस पाटील तपास करत आहेत