Satara News : मुले झोपली आहेत, ओरडू नकोस म्हटल्याने चाकूने खून
सातारा | मायलेकराचं लागलेलं भांडण सोडवायला गेल्यानंतर लहान मुले झोपली आहेत, मोठमोठ्याने ओरडू नकोस म्हटल्याने राग अनावर झालेल्या एकाने वृध्दावर चाकूने हल्ला केला. यामध्ये या वृद्ध मृत्यू झाला असून खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सातारा तालुक्यातील वडूथ येथे ही घटना रात्री 9 वाजता घडली आहे. या प्रकरणातील संशयिताला अटक केली असून उमेश गुलाब राठोड (वय- 29, रा. वडूथ) असे नाव आहे. तर पोपट गुलाब मदने (वय- 64) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृत पोपट मदने यांच्या शेजारी उमेश राठोड हा कुटुंबासह रहात आहे. रविवारी रात्री नऊच्या दरम्यान उमेश त्याच्या आईबरोबर मोठमोठ्याने भांडत होता. पोपट मदने हे त्यांना समजावण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी भांडण न करण्याबाबत सांगितले. ‘तू मोठ्या मोठ्याने ओरडू नकोस आमच्या घरात लहान मुले झोपली आहेत’, असेही मदने यांनी त्यांना सांगितले.
मात्र, उमेश राठोड याचा राग अनावर झाला. त्याने पोपट मदने यांच्या छातीवर चाकूने वार केले. हे वार पोपट यांच्या वर्मी लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, पोलीस उपनिरीक्षक फरांदे व त्यांच्या सहकार्यांनी संशयिताला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.