
सातारा । महाबळेश्वर- पोलादपूर मार्गावर आंबनेळी घाटात चिंरखिंडी येथे रात्री उशिरा दरड कोसळली असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिनाभरापासून महाबळेश्वर भागात पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. या मार्गावर रायगड हद्दीत दरड कोसळण्याची घटना घडली आहे. पाऊस मोठ्या प्रमाणावर असल्याने सकाळी दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच आंबनेळी घाटातून प्रवास न करण्याचे आवाहन पोलादपूर तहसिलदारांनी केले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वरहून- पोलादपूरला जाणाऱ्या मार्गावर रात्री उशिरा दरड कोसळली असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सध्या या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त वाढलेले असल्याने दरडी कोसळत आहेत. तेव्हा वाहनचालकांनी सावधानता बाळगून प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गेल्या महिनाभरात आंबनेळी घाटात दुसऱ्यांदा तर मेढा घाटात एकदा व तापोळा मार्गावरही एकदा दरड कोसळ्याचा प्रकार महिनाभरात झाला आहे. तेव्हा मुसळधार पाऊस सुरू झाला असून पुढील काही दिवस या मार्गावर प्रवास करताना प्रवाशी तसेच वाहन चालकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन प्रशासनाने केले आहे. रायगड हद्दीत आंबेनळी घाटात चिरेखिंडी येथे दरड कोसळली.



