घटनाक्रम : बलात्कार, खून अन् मरेपर्यंत फाशी… मन हेलवणारा खटला
सातारा जिल्ह्यातील एका चिमुकलीवरील अत्याचाराचा निकाल

– विशाल वामनराव पाटील
कराड न्यायालयाच्या इतिहासातील पहिलाच निकाल लागला मरेपर्यंत फाशीचा. पाटण तालुक्यातील सुतारवाडी- रूवले येथील 8 वर्षाच्या पिडीत चिमुकलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीला शिक्षा मिळाली. सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी आपला अनुभव लावला तर न्यायाधीश के. एस. होरे यांनी यावर मोहर उठवली. यामध्ये कोर्ट पैरवी म्हणून काम करणाऱ्या पोलिस कर्मचारी योगिता पवार यांनी अक्षरशः केवळ पोलिस कर्मचारी (ड्युटी), कर्तव्य म्हणून नव्हे तर आपलीच कोणीतरी आहे, अशा भावनेने त्यांनी पिडीत मुलीला न्याय मिळवून द्यायचाच, असा चंग बांधलेला दिसून आला. सरकारी वकिलच नव्हे तर या केसमधील प्रत्येक व्यक्ती, अधिकारी, साक्षीदार यांच्यासोबत त्याचा थेट संपर्क आला. त्यामुळे या केसचा अभ्यास तर त्यांना झालेला दिसून आलाच. परंतु, आपण आयुष्यात कोणासाठी, काहीतरी केल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. या केसमधील पिडितेचा काळ ठरलेला दिवस ते निकालाचा दिवस यामधील वकिलांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण पाहणार आहोत. या केसमध्ये 33 साक्षीदार तपासण्यात आले, त्यामध्ये स्वतः आरोपीही साक्षीदार असल्याचे वकिलांनी सांगितले. या सर्व घटनेत सीसीटीव्ही अन् मुख्य 4 साक्षीदार महत्वाचे ठरले, यामध्ये पिडीत मुलीची 6 वर्षाच्या मैत्रीणीची साक्ष कोर्टात महत्वपूर्ण ठरली.
बलात्कार, खून आणि आरोपी शांत झोपला
बुधवार 29 डिसेंबर 2021 रोजी सुतारवाडी- रूवले या गावात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी संतोष थोरात (वय- 41) हा पिडीत 8 वर्षाच्या मुलीला रानात घेवून गेला. रानातून घरी येताना घरातील पोपटासोबत खेळायला घेवून गेला. नंतर दुपारी 12 ते 3 वाजण्याच्या दरम्यान पिडीत मुलगी आणि तिची मैत्रीण खेळत होती. त्यानंतर मैत्रीण घरी गेली, तेव्हा पिडीत एकटीच खेळत होती. आरोपी संतोषने चाॅकलेट देतो म्हणून मुलीला त्याच्या घराशेजारील झाडाखाली नेले अन् तिथे तिच्यावर बलात्कार केला. सदरील घटना ही सायंकाळी 4 ते 6 वाजण्याच्या दरम्यान घडली. तेथेच आरोपीने विचार करून तिचा गळा आवळून दाबून खून केला. पिडीतेचा मृतदेह अोढ्यात टाकला. त्यानंतर आरोपी घरी येवून शांत झोपला.
आरोपीने स्वतः मृतदेह काढून पोलिासांना दिला
सायंकाळ झाल्याने घरातील लोक मुलगी घरी न आल्याने शोध लागले. यावेळी गावातील एकाने ढेबेवाडी पोलिस ठाण्यात 8. 30 वाजण्याच्या सुमारास फोन करून माहिती दिली. पोलिस सुतारवाडी- रूवले येथे आल्याने शोधाशोध सुरू झाली. यावेळी संतोष थोरात स्वतः पोलिस व ग्रामस्थांसोबत शोध मोहिमेत सहभागी होता. त्यामुळे त्याच्यावर संशयाची सुई नव्हती. परंतु, यादरम्यान साहिल नथुराम सुतार यांच्या घरावरील सीसीटीव्ही पोलिसांना निदर्शनास आला अन् त्यामध्ये पूर्ण दिवसातील लोकांच्या हालचाली, मुलगी कोणा- कोणासोबत होती ते समोर आले. पोलिसांनी आरोपी म्हणून नव्हे तर केवळ चाैकशीसाठी संतोषला ढेबेवाडी पोलिस ठाण्यात सोबत नेले. त्यानंतर त्याच्याकडे चाैकशी केली. तेथून पुन्हा गावात आणले, अन् घडलेल्या घटनास्थळावर नेले. पोलिसांनी मध्यरात्री 2. 15 ते 4. 15 यावेळेत पंचनामा केला. यामध्ये आरोपी संतोषनेच स्वतः फेकलेला पिडीत मुलीचा मृतदेह 25 ते 30 फूट खोलातून बाहेर काढून पोलिसासमोर ठेवला.
वैद्यकीय टीमची कामगिरी
या प्रकरणात पोलिस हवालदार प्रशांत तारळकर यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पुढे मुलीचा मृतदेह कराड येथे शवविच्छेदनासाठी पाठवला होता. यामध्ये ज्या ठिकाणी घटना घडली तेथे पिडीत मुलीच्या चपला, चाॅकलेटचा कागद आणि रक्ताचे डाग आढळून आले. शवविच्छेदन अहवालात मुलीच्या हातात आरोपीचे केस आढळून आले. वैद्यकीय पुराव्यातून संतोष हाच आरोपी असल्याचे समोर आले. वैद्यकीय कामात अरिफा सुतार, नागनाथ धर्माधिकारी, कोमल महाजन यांनी महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली.
ढेबेवाडी पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात दीड वर्षात निकाल
या प्रकरणात ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांनी तपास केला. घटनास्थळी तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, तत्कालीन कराडचे डीवायएसपी डाॅ. रणजित पाटील व तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट देवून आरोपीला कडक शिक्षा व लवकरात लवकर केस चालवली जाईल, सांगितले होते. या केसचा निकाल घटना घडल्यापासून दीड वर्षात लावण्यात सरकारी वकिल, पोलिस प्रशासन व न्यायालयाला यश आले आहे.
केसमधील 33 साक्षीदार तपासले
या केसमध्ये एकूण 33 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीत मुलीची मैत्रीण, आज्जी आणि दोन महिलांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. त्यासोबत सीसीटीव्ही, ग्रामसेवक, चाॅकलेट देणारा दुकानदार, फाॅरेन्सिक एक्सपर्ट प्रज्योत खेतमर यांच्या साक्षीने केस भक्कम झाल्याचे वकिलांनी सांगितले. तर या 33 साक्षीदारात स्वतः आरोपी संतोष यांची उलट साक्ष घेण्यात आली. या कोर्टाच्या कामात सरकारी वकील राजेंद्र शहा यांना अॅड. आर. डी. परमार, एम. डी. कुलकर्णी, एम. ए. पाटील, जाधव मॅडम यांनी सहकार्य केले.
कट पूर्वनियोजितच
सुतावरवाडी येथील दुकानातून दोन दिवस अगोदरच आरोपी संतोषने पिडीतेला चाॅकलेट देण्यासाठी खरेदी केले होते. त्यामुळे त्यांचा हा पूर्वनियोजित कट असल्याचे दिसून आले. बुधवार असल्याने यादिवशी शाळा होती, पंरतु, पिडित व तिची मैत्रीण दोघीही यादिवशी शाळेत हजर नव्हत्या. तसेच त्यादिवशी पिडीत मुलगी आरोपीसोबतच होती.
पोपट नाही म्हणणाऱ्या संतोषचा पोपट झाला
आरोपी संतोष थोरात याने माझ्या घरात पोपट ही वस्तू नसल्याचे म्हणत होता. तसेच मुलीला अोढ्यातून काढताना तिचे रक्त लागल्याचे म्हणत होता. तसेच माझ्या घरी माझी मुले आहेत, त्याचा विचार करावा अशी विनवणी करत होता. अखेर कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी संतोष पूर्णपणे गळून पडला. त्यामुळे पोपट असणारा संतोषचा पोपट झाला. आता पुढील सहा महिन्यात हायकोर्ट शिक्षेवर मोहर करेल अन् शिक्षा कायम होईल.
तुरूंगातून कोर्टाला पत्र
आरोपी संतोष याने तुरूंगातून कोर्टाला एक पत्र लिहिले होते. सदरील गुन्हा मी स्वतः केला असून, त्यामध्ये मला जास्तीत जास्त शिक्षा द्या म्हटले होते. परंतु हे पत्र स्वतः न लिहिता तुरूंगातील इतराकडून लिहून घेतले होते. जेणेकरून कोर्टात केसला वेगळं वळण लागावे, म्हणून असा प्रयोग त्याने केल्याचे वकिलांनी सांगितले. त्याचबरोबर आरोपी संतोषला त्याच्या बचावासाठी कोर्टानेच वकिल दिला होता.
घटना ते निकालाच घटनाक्रम
बुधवार 29 डिसेंबर 2021 – सकाळी 11 वाजता संतोष थोरात मुलीला रानात घेवून गेला
दुपारी- 12 ते 3 मुलगी मैत्रिणीसोबत खेळत होती.
दुपारी- 4 वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलीच्या आज्जी आणि मुलीच्या मैत्रीणीने संतोष सोबत असल्याचे पिडीतेला पाहिले.
सायंकाळी- 4 ते 6 यावेळेत मुलीवर बलात्कार आणि खून
सायंकाळी- 6 नंतर घरात येवून झोपला.
रात्री- 8. 30 वाजता ढेबेवाडी पोलिसांना माहिती मिळाली.
रात्री- 9 वाजलेपासून पोलिसांकडून शोध सुरू
रात्री- 9 ते 1 दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी करून संतोषकडे चाैकशी केली.
रात्री- 1. 15 ते 2 मुलीचा मृतदेह आरोपी संतोषने स्वतः पोलिसांना अोढ्यातून काढून दिला.
रात्री- 2. 15 ते 4. 15 या वेळेत पोलिसांनी पंचनामा केला.
सकाळी कराड येथील उपजिल्हा रूग्णालयात मुलीवर शवविच्छेदन करण्यात आले.
20-1- 2022 रोजी- पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
4- 4- 2022 रोजी- कोर्टात दोषारोप ठेवण्यात आला
10- 5- 2022 रोजी- कोर्टाने पहिला साक्षीदार तपासला. (केस सुरू)
19-7- 2023- कोर्टात शेवटाचा युक्तिवाद करण्यात आला.
21- 7- 2023- कराड जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली.