Satara News : मराठा आरक्षणासाठी महिला सदस्याचा राजकीय पदाचा राजीनामा
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
राज्यात मराठा आरक्षणासाठी अनेकजण आंदोलन, उपोषण करत आहेत. तर काही युवकांनी या आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आहेत. आता राजकीय लोकांनीही यामध्ये आपली भूमिका घ्यावी, अशी मागणी होवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कान्हरवाडी येथील महिला कोमल जाधव यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला.
सातारा जिल्ह्यात कोमल जाधव यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय लोकही मराठा मोर्चात उतरल्याचे दिसू लागले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात मराठा बांधवांपैकी अनेक जण आपल्या राजकीय पदाचे राजीनामे देऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आहेत. यामध्ये आता सातारा जिल्ह्यातील कोमल जाधव यांही सहभागी झाल्या आहेत.
राज्यासह सातारा जिल्ह्यातील ग्रामीण गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे बॅंनर झळकू लागेल आहेत. तसेच राजकीय नेत्यांना आरक्षण देण्यासाठी राजीनामे देण्याची मागणी केली जावू लागली आहे. यामध्ये आता ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच यांनी राजीनामे दिल्याने आणखी कोण- कोण राजीनामे देणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.