Satara News : तलाठी आणि मंडल अधिकारी लाच घेताना रंगेहाथ ताब्यात
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
वडिलोपार्जित जमीनीचे वाटपाची सातबारा नोंद करण्यासाठी 13 हजार रूपयांची लाच घेताना तलाठी आणि मंडल अधिकारी यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. दोन्ही लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सातारचे पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राजेश वाघमारे यांनी दिली आहे. लोकसेवक जितेंद्र बाळासाहेब कोंडके (वय- 53 वर्षे, नोकरी- मंडळ अधिकारी, फलटण भाग, फलटण जि.सातारा वर्ग-3, रा. पुजारी कॉलनी, फलटण ता. फलटण), श्रीमती रोमा यशवंत कदम (वय-31 वर्ष, पद-तलाठी सजा फलटण, वर्ग-3, रा. मलठण ता. फलटण जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे वडिलोपार्जित जमीनीचे वाटणीपत्र झाले असुन त्याप्रमाणे सातबारा उता-यावर नोंद करण्यासाठी लोकसेवक तलाठी कदम यांनी स्वतःसाठी 3,000/- रुपये व लोकसेवक सर्कल कोंडके यांचेसाठी 10,000/- रुपये अशी एकुण 13,000/- रुपयांची लाच मागणी केली. लोकसेवक सर्कल कोंडके व तलाठी कदम यांचे कार्यालय फलटण चावडी येथील एकाच इमारतीत असुन लोकसेवक सर्कल कोंडके यांनी सदर लाच भागणीस प्रोत्साहन देऊन लाच रक्कम स्वतः त्यांचे सर्कल कार्यालय फलटण येथे स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले असुन दोन्ही लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ला. प्र. वि. पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक विजय चाैधरी, सातारचे पोलिस उपअधिक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पो. हवा. नितीन गोगावले, गणेश ताटे, पो.कॉ. निलेश येवले, म.पो.कॉ. शितल सपकाळ यांनी कारवाई केली.